गगनबावड्याचा मागासलेपणा कधी दूर होणार ?
By admin | Published: November 5, 2014 10:05 PM2014-11-05T22:05:24+5:302014-11-05T23:43:01+5:30
नव्या सरकारकडून अपेक्षा : तालुक्याची नेहमीच उपेक्षा; मोठी वनसंपदा, संधी असूनही दुर्लक्षित--गगनबावडा तालुका
एम. ए. शिंदे ल्ल साळवण --डोंगराळ, दुर्गम, कमी लोकसंख्येचा छोटा तालुका म्हणून जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सदैव उपेक्षित राहिलेल्या गगनबावड्याचे मागासलेपण दूर होऊन विकासाची गंगा कधी वाहणार हाच खरा प्रश्न आहे. छोटेपणामुळे तालुक्याला लोकसभा, विधानसभेचे दरवाजे प्रतिनिधींच्या रूपाने कधी ठोठावताच आले नाहीत. प्रत्येक निवडणुकीत तर तालुक्यातील उपऱ्या उमेदवारांचाच जयघोष करावा लागतो. वनसंपदेने नटलेल्या तालुक्याला ना पर्यटन क्षेत्राचे भाग्य लाभले, ना उद्योगधंद्याची चव चाखायला मिळाली. मिनी महाबळेश्वर म्हणवत असताना विकासाकडे मात्र आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी पाठ फिरविली. रेंगाळलेले प्रश्न सोडवून नवे सरकार तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार का? हे येणाऱ्या काळात पाहावे लागेल.
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्यात एक अधिकारी आणि ४३ कर्मचारी असणे अपेक्षित आहे. मात्र, येथे सध्या केवळ एक अधिकारी व २७ कर्मचारी कार्यरत आहेत. अद्याप १६ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तालुक्याचा बहुतेक भाग डोंगराळ, दुर्गम असल्यामुळे कामांचा निपटारा होण्यासाठी सर्व रिक्त जागा भरणे गरजेचे आहे. नव्याने पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, त्यात विभागनिहाय खोल्या नाहीत. अद्याप तेथे तीन ते चार खोल्यांची कमतरता असून, मिटिंग हॉल असणे आवश्यक होते. कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. सर्व दरवाजे आणि खिडक्या मोडल्या आहेत. काही खोल्यांना केवळ चौकटी उभ्या असलेल्या दिसतात. खोल्यांच्या आतील बाजूस, तसेच स्लॅबवर गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे. व्हरांड्याचा कठडा तुटला आहे. तसेच सर्व भिंती खराब झाल्या आहेत. सर्व खोल्या वापरण्यास अयोग्य झाल्या असून, तेथे सध्या सापांचे वास्तव्य आहे. कर्मचाऱ्यांच्या निवासाची मोठी अडचण निर्माण झाली असून, सध्या अनेकजण भाडोत्री खोल्यांतून राहत आहेत. कर्मचारी निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबित असून, तो मार्गी लागणे आवश्यक आहे.
केंद्र शासनाच्या निधीतून मंजूर झालेले आणि तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेमार्फत चालविले जात असलेले साखरी येथील ‘मॉडेल स्कूल’ सर्वार्थाने मॉडेल कधी बनणार? या शाळेला ग्रामपंचायतीने गायरानमधील जागा दिलेली आहे. ही शाळा निवासी स्वरूपाची होणार असून, तिचे कामकाज नवोदयच्या धर्तीवर चालविणे अपेक्षित आहे. सध्या येथे अध्यापक वर्ग हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून मानधनावर भरला आहे. या ठिकाणी पूर्ण क्षमतेने काम करणारा व निवासी स्वरूपाचा कर्मचारी वर्ग नियुक्त होणे अपेक्षित आहे. तीन वर्षे झाली तरी जुन्याच प्राथमिक शाळेच्या इमारतीत ही शाळा भरत आहे. शाळेसाठी नव्या जागेत इमारत, क्रीडांगण व निवासासाठी अद्ययावत वसतिगृह होणे गरजेचे आहे. अनेक प्रश्न पोटात सामावून घेऊन जगणाऱ्या गगनबावड्याला न्याय कधी मिळणार आणि प्रश्नांची सोडवणूक बदललेली राजकीय समीकरणे सोडविणार काय? हाच खरा प्रश्न आहे; अन्यथा ‘कुठे मागे नेऊन ठेवलात गगनबावडा माझा’, असे म्हणण्याची वेळ गगनबावडावासीयांवर येईल.
गगनबावडा येथे २००८ साली तत्कालीन मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते क्रीडासंकुलाचे उद्घाटन झाले होते.
२५ लाखांच्या निधीमधील या क्रीडासंकुलावरती सुमारे १२ लाखांचा निधी खर्ची पडला आहे. मात्र, संकुलाचे काम अर्धवट आहे. धावपट्टी तयार केली आहे. मात्र, या धावपट्टीच्या कडा अनेक ठिकाणी ढासळल्या आहेत. मैदानावर झाडे-झुडपे आणि गवत प्रचंड प्रमाणात वाढले आहे. क्रीडासंकुलाचे ठिकाण तालुक्याच्या एका टोकाला जिथे तीन महिने पाऊस पडतो, अशा गगनबावड्यात आहे. साळवण या मध्यवर्ती ठिकाणी हे क्रीडासंकुल झाले असते, तर खेळाडूंना त्याचा लाभ झाला असता.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचा अपवाद वगळता तालुक्यात शेतीशिवाय कोणताच उद्योगधंदा नाही. महाविद्यालये आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून बाहेर पडणाऱ्या युवकांच्या हाताला कामधंदा नाही. अनेकांचे मन निसर्गाचा लहरीपणा आणि तोट्यात जाणाऱ्या शेतीमध्ये रमत नाही. मिनी एमआयडीसीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला, तर बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. येथील रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू झाले, तर महिलांना काम मिळून बचत गटांना बळकटी येईल.
टेकवाडीचे दुर्दैव
पुरामुळे दरवर्षी टेकवाडीला बेटाचे स्वरूप प्राप्त होते. तेथील ग्रामस्थांचा महापुरात संपर्क तुटतो. लोकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागते. कुंभी नदीच्या वेगवान प्रवाहामुळे टेकवाडीची नदीकडील बाजूची सतत झीज होत आहे. येथील संरक्षण भिंतीचा प्रस्ताव प्रस्तावित होणे महत्त्वाचे आहे.तालुक्याला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिले आहे. सह्याद्रीच्या रांगेत विसावलेल्या तालुक्यात पर्यटनदृष्ट्या विकास करता येण्यासारखे असे अनेक स्पॉट आहेत. भुरळ पाडणारी पळसंब्याची पांडवकालीन लेणी, मोरजाईचे विस्तीर्ण पठार, खुणावणारे कोदे, अणदूर, लखमापूर, लघू पाटबंधारे, साळवण येथे कुंभी- सरस्वतीच्या संगमावर वसलेले ऐतिहासिक भवानी मातेचे मंदिर, आजूबाजूचा परिसर यांच्या सुशोभीकरणाचा प्रश्न रखडला आहे. वनविभागाच्या कार्यक्षेत्रात हा परिसर येत असल्यामुळे वनविभागाने अनेकवेळा या परिसराचा विकास आराखडा बनविला. मात्र, अद्याप हा आराखडा कागदावरच राहिला आहे.