कोल्हापूर - पुणे मार्गावरील उर्वरित चार पॅसेंजर धावणार कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 06:05 PM2021-12-17T18:05:57+5:302021-12-17T18:22:15+5:30

सध्या कोल्हापूर - सातारा मार्गावर एक पॅसेंजर सुरू आहे.

When will the remaining four passenger trains on Kolhapur Pune route run | कोल्हापूर - पुणे मार्गावरील उर्वरित चार पॅसेंजर धावणार कधी ?

कोल्हापूर - पुणे मार्गावरील उर्वरित चार पॅसेंजर धावणार कधी ?

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोल्हापूर - पुणे मार्गावरील उर्वरित चार पॅसेंजर रेल्वे कधी धावणार, याची प्रवाशांना प्रतीक्षा लागली आहे. सध्या कोल्हापूर - सातारा मार्गावर एक पॅसेंजर सुरू आहे.

कोल्हापूर - पुणे, सातारा, मिरज, सांगली या मार्गांवरील पाच पॅसेंजर रेल्वेंद्वारे सेवा मध्य रेल्वेकडून दिली जाते. कोरोनापूर्वी या पॅसेंजरमधून रोज सुमारे पाच हजारजण प्रवास करत होते. त्यामध्ये नोकरदार, छोटे व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मध्य रेल्वेने पॅसेंजर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार दि. १६ नोव्हेंबरपासून एक पॅसेंजर रेल्वे सुरू झाली. मात्र, ही रेल्वे साताऱ्यापर्यंत जाण्यापुरतीच उपयोगी पडत आहे. एसटी सेवा अद्याप सुरळीत नसल्याने उर्वरित चार पॅसेंजर रेल्वेंची सेवा लवकर सुरू व्हावी, अशी आग्रही मागणी प्रवाशांतून होत आहे.

केवळ एकच पॅसेंजर सुरू

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोल्हापूर ते सातारा ही पॅसेंजर तब्बल १८ महिन्यांनी दि. १६ नोव्हेंबर रोजी धावली. त्यातून पहिल्या दिवशी ५२४ जणांनी प्रवास केला होता.

जनरल तिकीट बंदच

कोल्हापूर - सातारा ही पॅसेंजर वगळता अन्य रेल्वेंतून प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षण करणे आवश्यक आहे. विशेष दर्जा रद्द झाला, तरी आरक्षण करणे बंधनकारक असल्याने प्रवाशांना जादा पैसे आणि वेळ खर्च करावा लागत आहे.

सुरू असलेल्या एक्सप्रेस

कोल्हापूर - मुंबई (महालक्ष्मी)

कोल्हापूर - दिल्ली

कोल्हापूर - नागपूर (व्हाया पंढरपूर)

कोल्हापूर - अहमदाबाद

कोल्हापूर - तिरुपती

कोल्हापूर - मुंबई (कोयना)

कोल्हापूर - नागपूर (महाराष्ट्र)

कोल्हापूर - धनबाद

प्रवाशांच्या खिशाला झळ

अन्य पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने कोल्हापूरमध्ये येणाऱ्या आणि येथून जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार, छोटे व्यावसायिक, आदी प्रवाशांची अडचण होत आहे. या पॅसेंजरची सेवा लवकर सुरू करावी. - पुरूषोत्तम बियाणी, नागाळा पार्क

सध्या सुरू असलेल्या पॅसेंजरचा केवळ साताऱ्यापर्यंत जाण्यासाठी उपयोग होत आहे. विशेष रेल्वेचा दर्जा देऊन संबंधित पॅसेंजर सुरू असल्याने तिकिटासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उर्वरित पाच पॅसेंजर सुरू कराव्यात. छोट्या स्थानकांवर रेल्वे थांबवाव्यात. - ललित शहा, जयसिंगपूर

Web Title: When will the remaining four passenger trains on Kolhapur Pune route run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.