राशिवडे बस स्थानकावर एसटी येणार तरी कधी?;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:24 AM2020-12-31T04:24:17+5:302020-12-31T04:24:17+5:30
राशिवडे : येथील बसस्थानकावरून एकही एसटी ये-जा करत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत राधानगरी आगार प्रमुखांकडे तक्रार करूनही ...
राशिवडे : येथील बसस्थानकावरून एकही एसटी ये-जा करत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत राधानगरी आगार प्रमुखांकडे तक्रार करूनही चालक आणि वाहकांच्या मनमानीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राशिवडेबाहेरील रस्त्यावरून एसटी वाहतूक सुरू असून प्रवाशांची गैरसोय होत आहे. कोल्हापूर परिवहन विभाग व राधानगरी आगार प्रमुखांनी याबाबत सक्त सूचना चालक व वाहकांना द्याव्यात अशी मागणी प्रवाशांतून होत आहे राशिवडेस कोल्हापूर, परिते, राशिवडे व कोल्हापूर, सडोली, हसुर, राशिवडे असे दोन मार्ग आहेत. मात्र या दोन्ही मार्गावरील एकही एसटी राशिवडे बसस्थानकावर येत नाही.. परिते मार्गे येणारी एसटी ही जुने प्राथमिक आरोग्य केंद्र व इंदिरानगर येथे थांबते. इथून मुख्य बस स्थानक एक किलोमीटर अंतरावर आहे, तर सडोली, हसुर मार्गे येणारी एसटी ही नेताजी मंडळ थांबा, गोठण व इंदिरानगर येथे थांबते. येथूनही प्रवाशांना सुमारे एक ते दीड किलोमीटर पायपीट करावी लागते. परिते मार्गे येणारी एसटी ही नियत मार्गावरून धावत नसल्याने याबाबत अनेक वेळा तक्रारी झाल्या. मात्र चालक आणि वाहकांनी आपली मनमानी सुरुच ठेवली आहे. एसटी मुख्य बस स्थानकावर येत नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असून, ही वाहतूक वेळेत नसल्याने ताटकळत राहावे लागत आहे. मुख्य बस स्थानकावरील बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि प्रवाशांतून होत आहे. दरम्यान, राधानगरी आगारप्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
................
राशिवडे बाजारपेठ व मुख्य मार्गावर गर्दी असते, म्हणून आम्ही या मार्गावर एसटी नेत नाही असे वाहकांचे म्हणणे आहे, तर कोल्हापूरमध्येही गर्दी असते, मग पुईखडीवरुनच एसटी मागे का आणत नाही, असे एका प्रवाशाने वाहकास विचारले असता, वाहकाने उद्धटपणे उत्तर दिले. त्यावरून त्यांच्यात जुंपली. असे प्रकार वारंवार घडत आहेत.