पेट्रोल पंप कामगारांची परवड थांबणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 11:54 PM2018-07-08T23:54:43+5:302018-07-08T23:55:11+5:30
दत्तात्रय पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हाकवे : किमान वेतन आणि आठ तास कामाचा कायदा असतानाही पेट्रोल पंप व गॅस एजन्सी कामगारांना तुटपुंजा पगार आणि २४ तास काम लावून मालकांकडून त्यांची गळचेपी होत आहे. राज्यात दोन लाखांहून अधिक कामगार आपल्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाचे साधन म्हणून हे काम करीत आहेत, तर जिल्ह्यात २५४ पेट्रोल पंप असून, यामध्ये साधारणत: तीन हजार कामगार कार्यरत आहेत. पंपमालकांच्या मनमानीमुळे या कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, सीटूच्या झेंड्याखाली एकसंध होत न्याय्य हक्कासाठी हे कामगार लढा उभा करण्याच्या तयारीत आहेत.
२ आॅक्टोबर२०१७ ला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकांनी आदेश काढून सर्व पंपमालकांना किमान वेतनाच्या सूचना दिल्या होत्या. पंपमालकांची कमिशन वाढ करताना ही अट घातली होती. मात्र, याची तंतोतंत अंमलबजावणी होताना दिसत नाही.
म्हणूनच किमान वेतनला खीळ : लाल बावटा
विविध कंपन्यांचे सेल्स आॅफिसर व स्थानिक पंपमालकांमध्ये सेटलमेंट होत असते. त्यामुळेच कंपनीकडून कामगारांना किमान वेतन व आठ तास कामाबाबत विचारणा होत नाही;परंतु यामध्ये कामगार भरडला जात असून, त्यांच्या आर्थिक प्रगतीला खीळ बसत असल्याचा आरोप संघटनेचे नेते भरमा कांबळे व कॉ.चंद्रकांत यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.
अशी होते पिळवणूक..!
थंडी,ऊन, वारा,पाऊस यांचा विचार न करता हे कामगार पंपावर काम करतात.कामगारांकडे वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल सोडण्याचे काम असले तरी वेतनाचा रिमोट कंट्रोल मालकांकडेच असतो. या कामगारांना किमान दरमहा१६हजार रुपयांपर्यंत वेतन देण्याचा कायदा आहे. मात्र,ग्रामीण भागात३ते४हजार व शहरी भागात५ते७हजारांपर्यंतच वेतन दिले जाते.त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात त्यांचे वेतन जमा करण्यात येऊ लागले; परंतु पगारात अल्पशी वाढ करून उर्वरित रक्कम बँक खात्यावरून कामगाराने काढून मालकांकडे सुपूर्द करण्याचा अलिखित नियम करून वेठीस धरले जात आहे.त्यामुळे कामगारांकडे अन्य वेतन मालकांकडे अशी स्थिती झाली आहे.
...अन् पहारेकऱ्यांचीही भूमिका
ग्रामीण भागातील पंपांवर दोन किंवा तीनच कर्मचारी असतात.२४तास ड्यूटी असल्यामुळे रात्री-अपरात्रीही एकट्यालाच थांबावे लागते. वॉचमन नसल्यामुळे या कामगारांना पंपाचा पहारेकरी व्हावे लागते. तसेच विक्री झालेल्या पेट्रोल-डिझेलचे पैसे सकाळपर्यंत सांभाळून ठेवताना दमछाक होत असल्याचे कामगारांतून बोलले जात आहे.