साखर कारखान्यांना पाझर फुटणार कधी?
By admin | Published: May 26, 2015 12:39 AM2015-05-26T00:39:32+5:302015-05-26T00:49:27+5:30
दोनच कारखान्यांकडे दातृत्व : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाबाबत उदासीन
प्रवीण देसाई - कोल्हापूर -कर्जाचा डोंगर असाह्य झाल्याने मृत्यूला कवटाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची अवहेलना अद्याप संपलेली नाही. या पीडितग्रस्तांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी साखर कारखान्यांनी त्यांना दत्तक घ्यावे, असा निर्णय झाला असताना जिल्ह्यातील शरद सहकारी साखर कारखाना, नरंदे (ता. हातकणंगले) व आजरा सहकारी साखर कारखाना वगळता एकाही कारखान्याने दातृत्व दाखविलेले नाही.
दहा वर्षांत कर्जाची परतफेड न झाल्याने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात ८५ पर्यंत आहे. त्यांच्यापैकी ६३ जण शासकीय सानुग्रह अनुदानास पात्र आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांची परिस्थिती दयनीय आहे. त्यांची ससेहोलपट सुरू आहे.
पोटाची खळगी भरताना त्यांना अनेक दिव्ये पार करावी लागत आहेत. त्यातच आपल्या पाल्याने शिकावे, असे कुठल्या आईला वाटणार नाही; परंतु दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना शिक्षणाचा खर्च करायचा कुठून, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे या मुलांचे भवितव्य अंधकारमय आहे. ९ डिसेंबर २००९ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक झाली. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय झाला.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या एका संघटनेने सुचविलेल्या ‘फॉर्म्युल्या’नुसार इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी २५०० रुपये व पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी ५००० रुपये देण्याचे निश्चित झाले. प्रत्येक वर्षाला मिळणाऱ्या या रकमेमध्ये खंड पडू नये, यासाठी ही रक्कम ठेव म्हणून बँकेत ठेवून त्याच्या व्याजावर ही मदत त्या मुलांना द्यावी, असेही ठरले होते.
परंतु, जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी शरद व आजरा साखर कारखाना सोडले, तर इतरांनी दातृत्व दाखविलेले नाही.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून वारंवार याबाबत पत्रव्यवहार करूनही त्याला ‘केराची टोपली’ दाखविल्याचे दिसत आहे. या दोन्ही साखर कारखान्यांनी आपली सामाजिक बांधीलकी जोपासत आपल्या कार्यक्षेत्रातील मुलांना दत्तक घेतले आहे.
यांना घेतले दत्तक
शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कै. संजय पाटील (रा. टाकवडे) यांचा मुलगा गंगाधर याच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे, तर आजरा साखर कारखान्याच्यावतीने कै. राजाराम भीवा धडाम (मोरेवाडी) यांच्यासाठी पांडुरंग याच्या शिक्षणासाठी मदत केली आहे.
शेतकऱ्यांविषयी वरवरची आस्था दाखविणारे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी प्रत्यक्षात जेव्हा शेतकऱ्यांना मदतीची गरज असते, तेव्हा पाठ फिरवितात. या प्रश्नावर शुक्रवारी (दि.२२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. यावेळी सकारात्मक मार्ग निघाला नाही, तर पावसाळी अधिवेशनावेळी सरकारविरोधी मुंबईत आंदोलन करू.
- शिवाजीराव परुळेकर, अध्यक्ष,
जनता नागरी निवारा संघटना