यंदाच्या मानाच्या शाहू पुरस्काराची घोषणा होणार कधी?, २०२० मधील पुरस्कारांचे अजून वितरण नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 11:20 AM2022-06-02T11:20:38+5:302022-06-02T11:22:16+5:30

शाहू स्मृती शताब्दीत जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने वर्षभर शाहूंच्या विचारांचा जागर केला जात असताना, तेच अध्यक्ष असलेल्या शाहू स्मारकची अवस्था वेदनादायी आहे. शाहू स्मारक हे कोल्हापूरचे सांस्कृतिक वैभव आहे. तिथे कांही चांगले घडावे, या हेतूने तेथील गैरव्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका आजपासून...

When will this year's prestigious Shahu Award be announced, The 2020 awards have not yet been distributed | यंदाच्या मानाच्या शाहू पुरस्काराची घोषणा होणार कधी?, २०२० मधील पुरस्कारांचे अजून वितरण नाही

यंदाच्या मानाच्या शाहू पुरस्काराची घोषणा होणार कधी?, २०२० मधील पुरस्कारांचे अजून वितरण नाही

googlenewsNext

रयतेचे राजे, दीनांचे कैवारी, पुराेगामी आणि विकासाची दूरदृष्टी लाभलेले लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती कार्याच्या स्वरूपात राहाव्यात यासाठी कोल्हापुरातील दसरा चौकात उभारण्यात आलेल्या शाहू स्मारक भवन या वास्तूला आणि ट्रस्टच्या कामकाजाला गेल्या काही वर्षांत गैरकारभाराची वाळवी लागली. शाहू स्मृती शताब्दीत जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने वर्षभर शाहूंच्या विचारांचा जागर केला जात असताना, तेच अध्यक्ष असलेल्या शाहू स्मारकची अवस्था वेदनादायी आहे. शाहू स्मारक हे कोल्हापूरचे सांस्कृतिक वैभव आहे. तिथे कांही चांगले घडावे, या हेतूने तेथील गैरव्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारी वृत्तमालिका आजपासून...

इंदुमती गणेश

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीला अवघे २५ दिवस राहिलेले असताना, यंदाचा शाहू पुरस्कार कुणाला द्यायचा, यावर अजून चर्चा झालेली नाही. गेल्यावर्षी कोरोनामुळे पुरस्कारच जाहीर करण्यात आला नाही, तर २०२० साली ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ तात्याराव लहाने यांना जाहीर केलेल्या पुरस्काराचे वितरण अजून झालेले नाही. राजर्षी शाहू युवा पुरस्कार आणि ग्रंथ पुरस्कार तर बंदच झाले आहेत. महाराष्ट्राच्या साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात बहुमान समजला जाणाऱ्या शाहू पुरस्काराबद्दल अशी हेळसांड शाहूप्रेमींना वेदना देणारी आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा आणि वसा जपला जावा, एक असे स्मारक उभारले जावे, जे सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असावे, या उद्देशातून फेब्रुवारी १९८१ मध्ये शाहू स्मारक भवनची स्थापना केली. त्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्ट उभारण्यात आला. या ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी राज्य-देशपातळीवर पुरोगामी, सामाजिक चळवळीत आयुष्यभर योगदान दिलेल्या व्यक्तीला शाहू पुरस्कार दिला जातो. रोख एक लाख रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण २६ जूनला मोठ्या दिमाखदार सोहळ्यात होते.

सन २०२० साली ख्यातनाम नेत्ररोगतज्ज्ञ तात्याराव लहाने यांना या पुरस्काराची घोषणा केली. पण कोरोना संसर्गामुळे वितरण सोहळा झाला नाही. नंतर त्यांना भेटून वितरण करण्यात येणार होते, पण तसेही घडले नाही. गतवर्षी २०२१ सालीदेखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट होतेच. शिवाय जिल्हा प्रशासन वैद्यकीय उपाययोजनांमध्ये व्यस्त असल्याने गेल्यावर्षीचा पुरस्कार जाहीरच केला नाही.

सध्या सुरू असलेले २०२२ हे वर्ष शाहू स्मृती शताब्दीचे असल्याने वर्षभर शाहू विचारांचा जागर केला जात असताना, शाहू पुरस्काराचे विशेष नियोजन करणे गरजेचे आहे. कारण यंदा दोन पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पण अजून ट्रस्टच्या विश्वस्तांची बैठकच झालेली नाही किंवा पुरस्कार विजेत्याच्या नावावर चर्चाही झालेली नाही. नाव निश्चित केल्यावर संबंधित व्यक्तीची संमती घेऊन पुरस्काराची घोषणा करण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ही प्रक्रिया सुरू करण्याची गरज आहे.

अन्य पुरस्कारदेखील सुरू व्हावेत...

शाहू पुरस्कार हा आयुष्यभर चळवळीत काम केलेल्या व्यक्तीला जीवनगौरव म्हणून दिला जातो. पण नवी पिढीदेखील आपल्या पातळीवर मोठे काम करत असते. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी शाहू युवा पुरस्कार व शाहू ग्रंथ पुरस्कार सुरू केला होता. पण त्यांची बदली झाल्यानंतर हे पुरस्कार बंद पडले. ही बंद केलेल्या पुरस्कारांची फाईलदेखील पुन्हा उघडण्याची गरज आहे.

Web Title: When will this year's prestigious Shahu Award be announced, The 2020 awards have not yet been distributed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.