पूरग्रस्त शाळांच्या दुरुस्तीचे १५ कोटी कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 10:11 PM2020-06-03T22:11:07+5:302020-06-03T22:13:25+5:30
पद्माळ, नावरसवाडीसह अनेक ठिकाणी पर्यायी खोल्यांत वर्ग सुरु आहेत. बहुसंख्य ठिकाणी पत्र्याच्या छताच्या खोल्यांची नासधूस झाली. तेथे नजीकच्या आरसीसी इमारतीत वर्ग भरविले जात आहेत. मौजे डिग्रजमध्ये लोकसहभागातून तीन खोल्यांची उभारणी करण्यात आली आहे.
संतोष भिसे ।
सांगली : गेल्यावर्षीच्या महापुरात जिल्ह्यातील १९७ शाळा इमारतींची नासधूस झाली. त्यांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शासनाकडे पाठविला. पण वर्ष झाले तरी निधी मिळालेला नाही. इमारतींच्या तात्पुरत्या दुरुस्त्या करुन वर्ग भरविले जात आहेत.
महापुरानंतर दुसरा पावसाळा आला तरी हा विषय दुर्लक्षित आहे. काही तालुक्यांत स्वयंसेवी संस्था व कॉर्पोरेट कंपन्यांनी खोल्या उभारुन दिल्या. पण शासनाची मदत मात्र मिळालेली नाही. वाळवा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ५७ शाळांची नासधूस झाली होती. मिरज, पलूस, शिराळा आदी तालुक्यांतही इमारतींमध्ये महापुराचे पाणी घुसले. वर्गखोल्यांच्या बांधकामासह शालेय साहित्य, फर्निचर, संगणक आदींची अतोनात हानी झाली. महापूर ओसरताच ग्रामस्थांच्या मदतीतून शाळा सावरल्या, वर्ग सुरु झाले. खोल्यांची दुरुस्ती मात्र झालीच नाही. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने नुकसानीचे पंचनामे करुन पंधरा कोटींच्या दुरुस्ती खर्चाचा प्रस्ताव पाठविला. तो बासनात गेल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे.
पद्माळ, नावरसवाडीसह अनेक ठिकाणी पर्यायी खोल्यांत वर्ग सुरु आहेत. बहुसंख्य ठिकाणी पत्र्याच्या छताच्या खोल्यांची नासधूस झाली. तेथे नजीकच्या आरसीसी इमारतीत वर्ग भरविले जात आहेत. मौजे डिग्रजमध्ये लोकसहभागातून तीन खोल्यांची उभारणी करण्यात आली आहे.
मिरज तालुक्यात : पक्क्या इमारती
मिरज तालुक्यात पश्चिमेकडील नदीकाठच्या गावांत बहुसंख्य इमारती आरसीसी असल्याने पडझड झाली नाही. महापुरानंतर साफसफाई करुन तेथेच वर्ग सुरु झाले. सांगली शहरातही नदीकाठच्या शाळा इमारती पक्क्या बांधकामाच्या असल्याने पडझड झाली नाही.
पलूस तालुक्यातील बोरबनमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांनी खोल्या बांधून दिल्या. सरकारी मदत मात्र अजूनही मिळालेली नाही.
पद्माळेत पुराचे पाणी शिरल्याने प्राथमिक शाळेची अशी दुरवस्था झाली होती.