चंद्रकांतदादा, शेट्टी कोठे आहेत ?

By admin | Published: December 13, 2014 12:21 AM2014-12-13T00:21:31+5:302014-12-13T00:27:14+5:30

के. पी. पाटील यांचा सवाल : शेतकरी संघटना, राज्यकर्त्यांना ऊसदराचा विसर

Where are Chandrakant Dada, Shetty? | चंद्रकांतदादा, शेट्टी कोठे आहेत ?

चंद्रकांतदादा, शेट्टी कोठे आहेत ?

Next

कोल्हापूर : ऊस परिषदेत २५ नोव्हेंबरची डेडलाईन देणारे खासदार राजू शेट्टी व डेडलाईन अगोदर ऊसदराचा प्रश्न सोडवणारे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील कोठे आहेत ? असा सवाल करत उसाचा प्रश्न शेतकरी संघटनेसह राज्यकर्ते विसरले असल्याचा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील यांनी हाणला.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते बी. एन. पाटील-मुगळीकर होते. पाटील म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात राजू शेट्टी व विरोधकांनी पॅकेज व अनुदानाची मागणी करत सातत्याने टीका केली. आता ते सत्तेत आहेत. शेट्टींनीच सरकारला २५ नोव्हेंबरची डेडलाईन दिली होती. यावर इतके दिवस लागणार नाही, चुटकीसरशी उसाचा प्रश्न सोडवण्याची वल्गना मंत्री पाटील यांनी केली होती; पण त्यांना याची आठवण नाही. येथे उसाची ‘एफआरपी’ देण्यासाठी पैसे नाहीत. मात्र, कापसाला ‘एफआरपी’पेक्षा जास्त पैसे देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. वेगळ्या विदर्भाचे बीज ते येथूनच पेरत असल्याची टीकाही त्यांनी केली. कॉँग्रेस पक्षापासून जनता बाजूला जात आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खंबीरपणे जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. टोलसह इतर सामाजिक प्रश्नांसाठी जिल्हा राष्ट्रवादी एकसंधपणे रस्त्यावर उतरेल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादी सभासद नोंदणीचा प्रारंभही पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अनिलराव साळोखे यांनी प्रास्ताविकात सभासद नोंदणीची माहिती दिली. घरात एका जागी बसून नोंदणी न करता जनतेच्या दारात जाऊन नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रा. किसन चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी आभार मानले. माजी आमदार नामदेवराव भोईटे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, भैया माने, महिला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षा संगीता खाडे, कागलच्या नगराध्यक्षा आशाकाकी माने, ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, जिल्हा परिषद सदस्य ए. वाय. पाटील, बाबूराव हजारे, मुकुंद देसाई, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, रामराजे कुपेकर, प्रदीप पाटील, आप्पासाहेब धनवडे उपस्थित होते.

Web Title: Where are Chandrakant Dada, Shetty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.