सोन्या कुठे आहेस रे....आईची आर्त हाक, ‘त्या’ दोघा युवकांचा अद्याप ठावठिकाणा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:53 PM2018-07-23T14:53:36+5:302018-07-23T14:56:11+5:30
पंचगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या सत्यजित शिवाजी निकम (वय २०, रा. तोरस्कर चौक) या महाविद्यालयीन मुलाचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही.
कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या सत्यजित शिवाजी निकम (वय २०, रा. तोरस्कर चौक) या महाविद्यालयीन मुलाचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही.
गेले आठ दिवस त्याचे आई-वडील ‘सोन्या’ सुखरूप घरी परत येऊ दे, म्हणून देवाला प्रार्थना करीत आहेत. त्याची आई तर ‘सोन्या, कुठे आहेस रे बाळा...’ म्हणून अश्रू ढाळत आहे. त्याच्या ओढीने कुटुंब रात्री अन्नपाण्याशिवाय जागून काढत आहेत.
अंघोळीसाठी गेलेल्या तोरस्कर चौकातील सत्यजित निकम याने पोहण्यासाठी दि. १५ जुलैला पुलावरून पाण्यात उडी मारली तो पाण्याच्या वाहत्या प्रवाहातून वाहून गेला. त्याच दिवशी शिवाजी पुलावरून तीस वर्षांच्या युवकाने पुराच्या पाण्यात उडी मारली आणि तो बेपत्ता झाला.
या दोघांचा पोलीस प्रशासनासह रेस्क्यु पथक, आपत्कालीन पथकाद्वारे शोध मोहीम सुरू आहे. गेली आठ दिवस धुवाधार पावसात शोधमोहीम राबवली जात आहे. नदी परिसरातील झाडे, झुडपे पिंजून काढली; परंतु हाती दोघांचेही मृतदेह लागले नाही.
पाण्याची पातळी आता कमी होत आहे; त्यामुळे बुडालेले युवक दूरपर्यंत वाहत गेले असावेत असा अंदाज घेत शोध मोहीम शिये पंचगंगा नदी पुलापर्यंत राबविली असता त्यांचा शोध लागला नाही.
घरातून बोलत-चालत बाहेर पडलेला मुलगा सत्यजित महापुरात वाहून गेल्याने आई, वडील व नातेवाईक यांना धक्काच बसला आहे. आई तर ‘सोन्या, कुठे आहेस रे बाळा...’ म्हणून अश्रू ढाळत आहे. शेजारील महिला त्यांना सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गेले आठ दिवस ते सोन्या सुखरूप घरी परत येऊ दे, म्हणून देवाला प्रार्थना करीत आहेत. अजूनही त्यांना तो जिवंत असलेली भाबडी आशा आहे. त्याच्या ओढीने कुटुंब रात्री अन्नपाण्याशिवाय जागून काढत आहे. हातातोंडाला आलेला एकुलता सोन्या अचानक गायब झाल्याने निकम कुटुंबीय पूर्णत: हतबल झाले आहे.