कुठं आहेत राष्ट्रवादीचे नगरसेवक; शरद पवारांचा ‘पारा’ चढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 01:10 AM2019-04-13T01:10:21+5:302019-04-13T01:10:27+5:30
कोल्हापूर : आर. के. पोवार, कुठं आहेत राष्ट्रवादीचे नगरसेवक..? अशी विचारणा खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच शुक्रवारी सकाळी शहराध्यक्षांना ...
कोल्हापूर : आर. के. पोवार, कुठं आहेत राष्ट्रवादीचे नगरसेवक..? अशी विचारणा खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच शुक्रवारी सकाळी शहराध्यक्षांना केली. निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली असतानाही पक्षाचेच नगरसेवक अजूनही प्रचारात सक्रिय न झाल्याचा राग पवार यांनी व्यक्त केला.
पवार थांबलेल्या हॉटेलच्या रुममध्ये आर. के. पोवार त्यांना भेटायला गेल्यावर पत्रकारांच्यासमोरच ही विचारणा केली. यावेळी आर. के. यांनी नगरसेवक आपापल्या भागात प्रचारात सक्रिय झाले आहेत असे सांगण्याचा प्रयत्न केला परंतु पवार यांचे त्याने समाधन झाले नाही. चार-पाच नगरसेवकच पक्षाचे काम करत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर शरद पवार यांनी त्यांची यादी करा व ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवून त्यांना नोटीस काढा, अशा सूचना केल्या. त्यावर आर. के. यांनी तशी नावे कळवितो, असे भीत भीत सांगितले. शुक्रवारी सकाळी आठ वाजताच धनंजय महाडिक, व्ही. बी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, अनिल साळोखे, ही सर्व मंडळी हॉटेलवर आली. दरम्यान, तासाभराने श्रीपतराव शिंदे यांनी पवार थांबलेल्या खोलीमध्ये त्यांची भेट घेतली. यावेळी गडहिंग्लज जनता दलाचे अध्यक्ष उदय कदम उपस्थित होते. याचवेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, कणकवलीचे उपनगराध्यक्ष अबीद नाईक, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
येथील मार्केट यार्डमधील शाहूवाडीचे वस्ताद रंगनाथ ठाणेकर यांनीही पवार यांची भेट घेतली. पवार यांनी बारामतीमध्ये कुस्ती लावल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
हरियाणाहून कार्यकर्ते : महाडिक यांचे मित्र असलेले मनजित आणि त्यांचे पैलवान सहकारी प्रचारासाठी कोल्हापुरात आले आहेत. या हरियाणाच्या मित्रपरिवाराने यावेळी महाडिक आणि पवार यांची भेट घेतली.
श्रीपतराव शिंदे भेटले; परंतु पाठिंब्याचा निर्णय नाही
पवार यांची भेट घेऊन परत जाताना श्रीपतराव शिंदे म्हणाले, ‘साहेब फार त्रास झालाय आम्हाला’. समोर पत्रकार असल्याचे पाहून पवार यांनी त्यांना थांबविले. आता यांच्यासमोर नको, असे सांगितले. गेल्या पाच वर्षांत कारखान्याबाबत झालेल्या त्रासाबद्दलच शिंदे यांनी पवार यांच्याकडे तक्रार केल्याचे समजते.
४दरम्यान, पवार यांना भेटल्यानंतर शिंदे यांना पाठिंब्याबाबत विचारले असता, ‘काय ते साहेबांनाच विचारा’ असे सांगून शिंदे बाहेर पडले. दरम्यान सायंकाळी खासदार महाडिक यांच्या प्रचार यंत्रणेकडून शिंदे यांनी पाठिंबा दिला असल्याचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले. त्याबद्दल शिंदे यांच्याकडे पुन्हा विचारणा केल्यावर त्यांनी पवार यांची भेट झाली परंतु आम्ही अजून पाठिंब्याचा निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले.