तयारी विधानसभेची; स्वबळा’ची चाचपणी, पण कोल्हापूर जिल्ह्यात ताकदीचे उमेदवार कुठे आहेत
By राजाराम लोंढे | Published: May 27, 2024 01:37 PM2024-05-27T13:37:21+5:302024-05-27T13:37:41+5:30
आघाडी, महायुती एकसंध राहिल्यास काट्याची टक्कर
राजाराम लोंढे
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा धुरळा अजून खाली बसायचा असताना राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपातील ताणाताणी पाहता, विधानसभा स्वबळावर लढावी का? अशी चर्चा मोठ्या पक्षांत सुरू आहे. मात्र, कोल्हापूरचा विचार केला तर येथे बहुतांशी पक्षांकडे दहाच्या दहा मतदारसंघांत ताकदवान उमेदवार नसल्याने त्यांची कोंडी हाेऊ शकते. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुती एकसंध राहिली तर विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात काट्याची टक्कर पाहायला मिळणार हे निश्चित आहे.
राज्यात गेल्या पाच वर्षांत अनेक राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक पार पडली. महायुती व महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत झाली असली, तरी जागा वाटप करताना दोन्हीकडील नेत्यांची दमछाक झाली. अनेक ठिकाणी नाराजीचा फटकाही बसला. लोकसभेला ही अवस्था तर विधानसभेला इच्छुकांची संख्या आणि वाटणीला येणाऱ्या जागा पाहता, मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार आहेत. त्यामुळे मोठ्या राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेत स्वबळ आजमावले तर काय होऊ शकते? याची चाचपणी सुरू केली आहे. लोकसभेच्या निकालानंतर कोणी कोणत्या मतदारसंघात मदत केली आणि कोणी टांग मारली हे उघड होणार असल्याने त्यानंतरच स्वबळावर की एकत्रित लढायचे, याचा निर्णय होऊ शकतो.
कोल्हापुरात दहा विधानसभा मतदारसंघांतील स्थिती पाहिली तर दहाच्या दहा ठिकाणी ताकदवान उमेदवार एकाही राजकीय पक्षाकडे नाही. त्यामुळे स्वबळाची चाचपणी असली तरी येथे एकमेकांचा हात धरूनच निवडणूक लढवावी लागणार आहे.
असे आहेत पक्षनिहाय आमदार
मतदारसंघ - आमदार - पक्ष
- शिरोळ - राजेंद्र पाटील-यड्रावकर - अपक्ष
- इचलकरंजी - प्रकाश आवाडे - अपक्ष
- हातकणंगले - राजू आवळे - काँग्रेस
- शाहूवाडी - विनय कोरे - जनसुराज्य
- कागल - हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
- चंदगड - राजेश पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
- राधानगरी - प्रकाश आबीटकर - शिंदेसेना
- कोल्हापूर उत्तर - जयश्री जाधव - काँग्रेस
- कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील - काँग्रेस
- करवीर - स्वर्गीय पी. एन. पाटील - काँग्रेस
येथे होणार त्रांगडे..
महायुती :
कागल - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी), समरजीत घाटगे (भाजप)
चंदगड - राजेश पाटील (राष्ट्रवादी), शिवाजी पाटील, संग्राम कुपेकर (भाजप)
राधानगरी - प्रकाश आबीटकर (शिंदेसेना), के. पी. पाटील (राष्ट्रवादी)
इचलकरंजी - प्रकाश आवाडे (ताराराणी), सुरेश हाळवणकर (भाजप)
कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर (शिंदेसेना), सत्यजित कदम व महेश जाधव (भाजप)
शिरोळ - राजेंद्र पाटील-यड्रावकर (शिंदेसेना), माधवराव घाटगे (भाजप)
करवीर - चंद्रदीप नरके (शिंदेसेना), संताजी घाेरपडे (जनसुराज्य)
आघाडी :
कोल्हापूर उत्तर - जयश्री जाधव व मालोजीराजे (काँग्रेस ), संजय पवार (उद्धवसेना)
हातकणंगले - राजू आवळे (काँग्रेस), राजीव आवळे (राष्ट्रवादी शरद पवार गट), सुजित मिणचेकर (उद्धवसेना)