आंबेओहोळसाठी मंजूर केलेली २२७ कोटींची रक्कम गेली कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:47 AM2020-12-17T04:47:50+5:302020-12-17T04:47:50+5:30
* धरणग्रस्तांचे पुनर्वसनही नाही, धरणाचेही काम झालेले नाही आजरा : रखडलेल्या आंबेओहोळ प्रकल्पाला गती देण्यासाठी तत्कालीन महसूल व सार्वजनिक ...
* धरणग्रस्तांचे पुनर्वसनही नाही, धरणाचेही काम झालेले नाही
आजरा :
रखडलेल्या आंबेओहोळ प्रकल्पाला गती देण्यासाठी तत्कालीन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून २७७ कोटींची रक्कम मंजूर केली. पण, धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही व अद्याप धरणाचेही काम पूर्ण झालेले नाही. मग, मंजूर २२७ कोटी रुपयांची रक्कम गेली कुठे? असा सवाल भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी पत्रकार परिषदेत केला.
पुनर्वसन वेळेत न झाल्याने आंबेओहोळचे काम बंद पडण्याची वेळ आली आहे. युती सरकारच्या काळात प्रकल्पाला निधी मंजूर झाला. त्यानंतर प्रकल्पाचे काम मार्गस्थ लागले. मात्र, राज्यातील सत्ता बदलानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे धरणग्रस्तांनी कायद्याप्रमाणे आधी पुनर्वसन मगच धरण अशी टोकाची भूमिका घेतली. आता आघाडी सरकार अगोदर घळभरणीचे काम करू, पण पुनर्वसन झाल्याशिवाय पाणी अडविणार नाही असे म्हणत आहे. यावर धरणग्रस्तांचा विश्वास राहिलेला नाही. प्रकल्पाला भरीव निधीची तरतूद करूनही उत्तूर भागातील शेतकऱ्यांना अजून किती दिवस पाण्याची वाट पाहावी लागणार असाही सवाल उत्तूर भाजपा अध्यक्ष श्रीपती यादव, अतिषकुमार देसाई यांनी केला.
आंबेओहोळ धरणाला भाजपाचा विरोध नाही. पण, धरणग्रस्तांचे पुनर्वसनाशिवाय धरणाचे काम व पाणी साठवू देणार नाही. आम्ही राजकारण करीत नाही. १९९६ पासून आंबेओहोळ झालाच पाहिजे यासाठी पाठपुरावा केला आहे, असेही श्रीपती यादव, अरुण देसाई, सुधीर कुंभार यांनी सांगितले.
आंबेओहोळमधील राजकारण थांबवा व धरणग्रस्तांचे पुनर्वसन करून धरण बांधा. शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे, याचा विचार करा, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष अशोक चराटी यांनी केले.