जिल्हा बँकेला जाब विचारणारे आजपर्यंत कुठे होते?
By admin | Published: November 8, 2015 08:35 PM2015-11-08T20:35:05+5:302015-11-08T23:42:19+5:30
भरमूअण्णा पाटील : ‘दौलत’बाबत जिल्हा बँकेला सहकार्य करणार
चंदगड : दौलत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्याबाबतीत जिल्हा सहकारी बँकेकडून योग्य तो प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्याला आडकाठी ‘दौलत’वर सत्ता भोगणारे माजी आमदार नरसिंगराव पाटील करत आहेत.
दौलतबाबत आज जिल्हा बँकेला जाब विचारण्याचा ढोंगीपणा करण्याचा खटाटोप करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात दौलत साखर कारखाना सुरू करायचा आहे, की हे सर्व नाटक-ढोंग आहे, असा सवाल माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. दौलत कारखान्याच्या भवितव्याबाबत चंदगड येथे झालेल्या पत्रकार पत्ररिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, दौलत कारखाना हा तालुक्यातील शेतकरी व कामगार यांना तारणहार होता. दौलत बंद पडल्यामुळे शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आहेत. ‘दौलत’ची आजची स्थिती येऊ नये म्हणून मी प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारत होतो. मात्र, यावेळी माईक बंद करणे, बोलण्यास मज्जाव करणे, कार्यकर्त्यांना मारहाण करणे, असे प्रकार केले जात होते. मी व माझ्या कार्यकर्त्यांनी मारहाण सहन केली आहे. डोकी फोडून घेतली आहेत, हे पूर्ण तालुकावासीयांना माहीत आहे. दौलतच्या कारभाराची माहिती पूर्ण राज्यभर सर्वांना माहीत आहे. पाईपच्याद्वारे स्पिरीटची केलेली चोरी, दौलतचा वापर राजकारण्यासाठी केला. दौलत कारखाना स्वत:च्या हितासाठी केला. गेली चार वर्षे कारखाना बंद आहे. तो सुरू करण्यासाठी जिल्हा बँक प्रभावीपणे प्रयत्न करीत आहे. जिल्हा बँक व दौलत कारखान्यात माजी आमदार नरसिंगराव पाटील बरेच वर्षे कार्यरत आहेत. दौलत कारखाना सुरू व्हावा यासाठी त्यांनीच अधिक प्रयत्न करावयास हवा होता. मात्र, तसे न होता जे कोणी प्रयत्न करत आहेत, त्यांना ते आडकाठी करत आहेत. त्यामुळे त्यांचे हे दुटप्पी धोरण सर्वांनाच समजले आहे. दौलत जर यावर्षी सुरू झाला नाही, तर जनता त्यांना माफ करणार नाहीत.