‘कृषिबंध’चे पैसे गेले कुठे ? : गुंतवणूकदार हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:58 AM2019-10-04T00:58:54+5:302019-10-04T00:59:48+5:30
गेल्या सहा महिन्यांपासून गुंतवणूकदार संचालकांचे उंबरे झिजवत आहेत. या तक्रारी थेट पोलिसांपर्यत गेल्या आणि कारवाईची टांगती तलवार समोर असतानाही पैसे परत करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे
दत्ता पाटील।
म्हाकवे : कृषिबंध अॅग्रो लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले. मात्र, गुंतवणूकदारांना ते परत न केल्याप्रकरणी जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असणारे म्हाकवे (ता. कागल) येथील बंडोपंत ऊर्फ बी. के. पाटील यांच्यासह संचालक के. के. कुंभार (आणूर) यांना अटक केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून गुंतवणूकदार संचालकांचे उंबरे झिजवत आहेत. या तक्रारी थेट पोलिसांपर्यत गेल्या आणि कारवाईची टांगती तलवार समोर असतानाही पैसे परत करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे इतकी रक्कम गेली तरी कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या कंपनीच्या नावावर स्थावर मालमत्ता नाही की रोख रक्कम शिल्लक नाही. तरीही पै-पै जमा करून गुंतवणूक केलेल्या हजारो गुंतवणूकदारंचे अद्याप कोट्यवधी रुपये या कंपनीकडे अडकले आहेत. असे असतानाही जबाबदार संचालक मंडळ एकत्रित येऊन रकमेची जबाबदारी न स्वीकारता एकमेकांकडे बोट दाखविण्यातच धन्यता मानत होते. कंपनी फायद्यात आली असती तर वाट्यासाठी मारामारी झाली असती. मग, तोट्याच्यावेळी काढता पाय का? असा सवाल गुंतवणूकदारांतून होत आहे.
कोल्हापूरसह सीमाभागातील हजारो गुंतवणूकदारांनी जादा व्याजाच्या आमिषाला बळी पडून कृषिबंध अॅग्रो कंपनीत कोट्यवधीची गुंतवणूक केल्याचे समजते. या कंपनीचे पहिले अध्यक्ष बंडोपंत पाटील-म्हाकवेकर यांनी २०१६ मध्ये राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी झटकली होती. तर विद्यमान अध्यक्ष शशिकांत जाधव-सोनगेकर हे सध्या अर्धांगवायूने आजारी आहेत. त्यांच्या पत्नी नंदा जाधव या कार्यकारी संचालिका होत्या.
या कंपनीच्या राजारामपुरी (कोल्हापूर), म्हाकवे, हमिदवाडा येथील कार्यालयांना कुलुपे आहेत. त्यामुळे स्वकमाईतील रक्कम या कंपनीत गुंतविलेले हवालदिल झाले होते. दरम्यान, ताराराणी आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली होती. त्यामुळे या प्रकरणाचे भिंग फुटले होते. पुणे, राधानगरी, भुदरगड चिक्कोडी परिसरात जागा, जमीन घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, एकही व्यवहार रितसर झालेला नसल्याचे समजते.
बी. के. हिरो ते झिरो...
घरात राजकीय पार्श्वभूमी नसतानाही बी. के. पाटील यांना बाजार समितीचे दहा वर्षे संचालक पद, त्यामध्ये पाच वर्षे सभापती पद, तसेच गोकुळ, बिद्री कारखान्यांतही संचालक केले. मात्र, त्यांनी २००७च्या दरम्यान राजकीय गट बदलून बिद्रीला पुन्हा संचालक होण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी लागली. त्यांना दोन्हींकडूनही पद मिळाले नाही. त्यामुळे दोन वर्षे ते राजकारणापासून अलिप्तच होते. त्यांनी बालाजी लकी ड्रॉ काढला. यामध्ये त्यांनी प्रचंड विश्वासार्हता संपादन केली. मात्र, कृषिबंधचे घोडे कुठे आडले कोण जाणे. राजकारणातील अत्यंत चतुर आणि धुरंधर असणारे पाटील हे यामध्ये गुरफटले गेले. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
संचालकांनी भान ठेवलेच नाही
- एजंटाना अमाप कमिशनबरोबरच कंपनी चालकांनी अलिशान गाड्या घेतल्याची चर्चा आहे. आलिशान हॉटेलमध्ये बैठका, सभा मंडपासाठी वारेमाप खर्च आणि ऐशोआरामी केल्याची चर्चा आहे.
- गुंतवणूकदारांची रक्कम परत करायची असते. याचे भानच त्यांनी ठेवले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पै-पै जमा करून या कंपनीत गुंतवलेले पैसे वायाच जाणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.