एक कोटीची झाडे गेली कुठे ? ‘अमृत योजना’ : तज्ज्ञांना डावलून कोट्यवधीच्या निधीची विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:23 AM2018-04-04T01:23:12+5:302018-04-04T01:23:12+5:30
कोल्हापूर : ‘अमृत’ योजनेअंतर्गत २०१५-१६ साली कोल्हापूर महापालिकेने एक कोटी रुपयांची झाडे लावली. पुढच्याच वर्षी यासाठी एक कोटी ६० लाख रुपये मंजूर झाले. याच निधीतून सध्या झाडे लावली जात आहेत.
समीर देशपांडे ।
कोल्हापूर : ‘अमृत’ योजनेअंतर्गत २०१५-१६ साली कोल्हापूर महापालिकेने एक कोटी रुपयांची झाडे लावली. पुढच्याच वर्षी यासाठी एक कोटी ६० लाख रुपये मंजूर झाले. याच निधीतून सध्या झाडे लावली जात आहेत. आता नव्या आर्थिक वर्षात शहरामध्ये पाच ठिकाणी दोन कोटी रुपये खर्चून झाडे लावण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. मात्र हे करताना कोल्हापूर महापालिकेने त्यांच्याच अंतर्गत कार्यरत असलेल्या वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समितीमधील तज्ज्ञांचा सल्लाच घेतला नसल्याचे पुढे आले आहे.
या योजनेतून पहिल्याच वर्षी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र केंद्र शासनाने हा निधी मंजूर करताना तो कसा खर्च करावा याचे काही निकष दिले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे महापालिकेने पुईखडी, जयंती नाल्याच्या उतारावर, झूम प्रकल्पावर, विविध स्मशानभूमींमध्ये झाडे लावून हा निधी खर्च केला. सध्या या जागांवर किती झाडे आहेत, हे पाहायला गेले तर मात्र वास्तव वेगळेच दिसते.
सध्या टेंबलाई, साळोखेनगर आणि बेलबाग येथे जी कामे सुरू आहेत त्यांसाठी एक कोटी ६२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आता तर नव्या आर्थिक वर्षात आणखी पाच ठिकाणी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून झाडे लावण्यात येणार आहेत. रंकाळा (१ कोटी), सह्याद्रीनगर (२९ लाख), टाकाळा (लाख), ( पान ४ वर)
महापालिकेचा खुलासा
हे उद्यान नसून वृक्षवन आहे, राज्यस्तरीय तांत्रिक समितीची प्रकल्पाला मान्यता आहे. प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी वृक्षलागवडीवर ५० टक्के, ३० टक्के लहान झाडे व वेलींसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. सिव्हिल वर्क २० टक्क्यांपेक्षा कमी खर्चाचे करावयाचे आहे. झाडांसाठी निकषांनुसार खड्डे काढले असून, त्यानुसार १/३ भाग जुनी माती भरून झाडे लावली आहेत. ९५ टक्के झाडे देशी प्रजातींची आहेत. दोन झाडांमधील अंतर चार ते पाच फूट आहे. ही वृक्षवने हवामान बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी आहेत. टेंबलाई येथे हा बदल झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
खुलाशातील दावेही चुकीचे
‘लोकमत’मध्ये मंगळवारी (दि. ३) याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधीक्षकांच्या स्वाक्षरीने खुलासा पाठविला आहे. त्यामध्ये प्रत्येक झाडामध्ये चार ते पाच फुटांचे अंतर असल्याचा आणि अडीच बाय तीन फुटांचा खड्डा काढल्याचा दावा केला आहे. मात्र बेलबाग आणि टेंबलाई परिसरातील साईटला भेट दिल्यानंतर हे दोन्ही दावे निखालस खोटे असल्याचे स्पष्ट होते.
महापालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समिती कार्यरत आहे. मात्र तीन ठिकाणी ही वने विकसित करताना डॉ. मधुकर बाचूळकर व अन्य सदस्यांचे मार्गदर्शन घेऊन झाडे लावावीत, अशी स्पष्ट सूचना आयुक्तांनी केली असताना थेट झाडे लावल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली आहे.
- उदय गायकवाड, कोल्हापूर महा. वृक्ष प्राधिकरण सदस्य