आंबेओहोळचे दोनशे कोटी रुपये गेले कोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:45 AM2021-03-04T04:45:35+5:302021-03-04T04:45:35+5:30
उत्तूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या करकीर्दीत आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २२७ कोटींहून अधिक निधी ...
उत्तूर :
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या करकीर्दीत आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २२७ कोटींहून अधिक निधी पुनर्वसन, प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींचे प्रश्न, सोयी-सुविधा, जमिनीचे वाटप व मोबदला यासाठी मंजूर केलेला होता, तरीही अद्याप पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. मग हे सव्वादोनशे कोटी रुपये गेले कुठे? असा प्रश्न भाजपा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
प्रकल्पाच्या पुनर्वसनप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी घाटगे यांनी केली आहे.
कोणत्याही परिस्थितीत हे धरण पूर्ण झाले पाहिजे, आमची ही मागणी पहिल्यापासून आहे. आधी पुनर्वसन नंतर धरण असा कायदा आहे. तो मोडून धरणग्रस्तांना विश्वासात न घेता आंबेओहोळ धरणाच्या घळभरणीचे काम स्थानिक प्रशासनावर दबाव टाकून पोलीस बंदोबस्तात सुरू आहे.
कोणतेही राजकीय वळण न देता गेली २१ वर्षे रेंगाळलेल्या या धरणाच्या पूर्ततेसाठी सरकारने आता तातडीने लक्ष घातले पाहिजे.
प्रकल्प पूर्ण होण्याआधी धरणग्रस्तांचे समाधानकारक पुनर्वसन करणे हेही तितकेच गरजेचे आहे. पुनर्वसनाचा प्रश्न ३१ जानेवारीअखेर पूर्ण सोडवण्यात येईल, असे शासनाने जाहीर केले होते. त्याला शासनाकडूनच तिलांजली देऊन पुनर्वसनाचे काम अपूर्ण असताना घळभरणीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू आहे. केवळ श्रेयवादासाठी एका मंत्र्यांच्या दबावाखाली प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे, असे वाटते. एका बाजूला म्हटले जाते पुनर्वसन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि दुसऱ्या बाजूला दडपशाहीने घळभरणीचे काम सुरू केले जात आहे, हा काय प्रकार आहे? त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या भावना दुखावल्या आहेत व शासनाच्या विरोधात धरणग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
------------------------
*
मंत्र्यांची श्रेयवादासाठी घळभरणी
विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्याआधीच घळभरणीच्या कामाची घाई करताहेत, हे अन्यायकारक आहे. हा प्रश्न त्यांच्यांमुळेच आणखी चिघळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी पुनर्वसनासह प्रकल्पाचे काम मार्गी लावावे, अशी मागणीही घाटगे यांनी केली आहे.
दोनशे कोटींचा अजूनही हिशेब नाही
मागील सरकारने दोनशे कोटी पुनर्वसनासाठी दिले होते. त्याचे नेमके काय केले ? याचे साधे उत्तर मंत्री महोदय, पुनर्वसन विभाग देत नाही, ही बाब गंभीर आहे. त्याचा खुलासा करावा.