‘दक्षिण’च्या आमदारांना भेटायचे कुठे ?
By admin | Published: September 23, 2015 12:24 AM2015-09-23T00:24:15+5:302015-09-23T00:24:27+5:30
सतेज पाटील : अमल महाडिकांवर टीका, पालकमंत्र्यांनी गरिबांची पेन्शन बंद केली
कोल्हापूर : पेन्शन बंद झाल्यामुळे शिरोलीतील घरात जाऊन भेटायला गरिबांकडे बसच्या तिकिटाला पैसेही नाहीत; त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आमदारांना भेटायचे कसे आणि कोठे, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे त्यांना मते टाकणाऱ्यांना आता पश्चात्ताप होत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी नामोल्लेख टाळत आमदार अमल महाडिक यांच्यावर मंगळवारी केली. आम्ही लाभार्थ्यांना पेन्शन सुरू केली, हे खुपत असल्यामुळेच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे ‘बोगस’ या नावाखाली पेन्शन बंद करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
विविध योजनांमधील पेन्शन सुरू करावी, या मागणीसाठी काढलेल्या मोर्चाप्रसंगी ताराबाई पार्कातील बालाजी गार्डनमध्ये ते बोलत होते. शुक्रवारी (दि. १८) शिवाजी चौकात झालेल्या कार्यक्रमात आमदार महादेवराव महाडिक यांनी नाव न घेता सतेज पाटील यांच्यावर टीकेचा भडिमार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाटील यांनी आमदार अमल यांच्यावर ‘निशाणा’ साधला.
पाटील म्हणाले, चार दिवसांपूर्वी जोतिबाला अभिषेकासाठी गेलो होतो. त्यावेळी माझ्या मतदारसंघातील एका अनोळखी मतदाराने माझी भेट घेतली. ‘साहेब, आमचे चुकले, त्यांना मत दिले, आता पश्चात्ताप होत आहे, असे सांगितले. माझे शहरात ‘अजिंक्यतारा’ येथे कार्यालय आहे. तेथे सर्वसामान्य येऊ शकतात. त्यांचे प्रश्न सोडविण्याची व्यवस्था होते. आताच्या ‘दक्षिणे’च्या आमदारांना भेटायचे कोठे, असा प्रश्न आहे.
‘दक्षिणे’त भाजपचे कार्यकर्ते फिरत आहेत. ‘बंटी पाटील’ असे दारावर स्टिकर असलेल्या कुटुंबाची ‘संजय गांधी निराधार योजने’ची पेन्शन बंद केली जात आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा दहा हजार बोगस पेन्शनचे लाभार्थी असल्याचे सांगत आहेत. सत्तेची मस्ती आली आहे, म्हणून रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे, असेही पाटील यांनी सांगीतले.
पैसे देऊन झाले आमदार
पेन्शन बंद झाली आहे म्हणून आमदारांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली.
त्यावेळी त्या कार्यकर्त्याने ‘निवडणुकीत पैसे दिले आहेत; त्यामुळे पाच वर्षे आमच्याकडे यायचे नाही,’ असे सांगितल्याचे लाभार्थी शकुंतला चौगुले
(रा. निगवे खालसा) यांनी पाटील यांचे भाषण सुरू असताना मध्येच उठून सांगितले. हा संदर्भ घेऊन पाटील म्हणाले, ‘दक्षिण’मधील निवडणूक कशी जिंकली हे यातून स्पष्ट झाले आहे. पैसे वाटून ते आमदार झाले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटून काम सांगितले तर ‘तुम्ही निवडणुकीत पैसे घेतले आहेत. पाच वर्षे यायचे नाही,’ अशी उत्तरे ते देत आहेत.