सरकारपुढे घासून घासून उध्दव यांना नाक कुठे राहिलेय : नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 05:16 PM2017-12-08T17:16:52+5:302017-12-08T17:21:36+5:30
उध्दव ठाकरे यांना राजकारण कळत का, कोणत्याही खात्याची त्यांना माहिती नाही. सरकारसोबत पटत नसेल तर घटस्फोट घ्या, सत्तेत तीन वर्षे नाक घासत घासत काढल्यामुळे उध्दव यांना नाक कुठे राहिले आहे, अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कोल्हापूरात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.
कोल्हापूर : उध्दव ठाकरे यांना राजकारण कळत का, कोणत्याही खात्याची त्यांना माहिती नाही. सरकारसोबत पटत नसेल तर घटस्फोट घ्या, सत्तेत तीन वर्षे नाक घासत घासत काढल्यामुळे उध्दव यांना नाक कुठे राहिले आहे, अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कोल्हापूरात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.
नारायण राणे पक्ष स्थापनेनंतर प्रथमच राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा कोल्हापूरातून सुरु झाला. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. या परिषदेत राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.
नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, त्यापासून शिवसेना काही बोध घेणार का, अशी थेट टीका राणे यांनी उध्दव यांच्यावर केली. सत्तेत रहायचे आणि पंतप्रधानापासून मु्ख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांवर टीका करायची. आता केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरच टीका करायची बाकी आहे. इतकेच नाराज आहात तर बाहेर का पडत नाही असा सवाल करत राणे म्हणाले, उध्दव सत्तेतून बाहेर पडले, तर त्यांचे दुकान बंद पडेल, अशी खोचक टीका केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहाही जागा शून्यावर आणीन, असे सांगतानाच राणे यांनी शिवसेनेचे नामोनिशाण राहणार नाही, पण शिवसेनेच्या विद्यमान आमदारांचे नुकसान करणार नाही. त्यांची आमदारकी त्यांना मिळेल, फक्त ती कोणत्या पक्षाची असेल, हे तुमचे तुम्हीच ओळखा, असेही राणे म्हणाले.
केवळ सिंधुदुर्गच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र माझा बालेकिल्ला आहे. मी मुख्यमंत्री असताना जे चांगले निर्णय घेतले, त्या बळावरच जनता मला पाठिंबा देत आहे. कोल्हापूरच नव्हे तर गडचिरोलीतही माझी जादू चालते, अशा शब्दात नारायण राणे यांनी विरोधकांना टोला लगावला. सध्या माझ्या पक्षात जो येईल, त्याला घेण्याचे धोरण नाही. मग माझ्या आणि इतर पक्षात काय फरक राहिला असा सवालही त्यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
पक्षात आता घेउन नीतेश आणि नीलेश या दोन्ही मुलांची कारकीर्द मी संपविणार नाही. त्यांचा राजीनामा हा त्यांचे नुकसान करणारा ठरेल. कारकीर्द पूर्ण झाली की ते पक्षात येतील असे सांगत राणे यांनी मंत्रीपदाबद्दल थोडी वाट पहा असे भाष्य केले.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करणार नाही, असे सांगून राणे म्हणाले, मी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हावी बाळासाहेबांवर टीका केली नव्हती, असे सांगितले.
गुजरातमध्ये भाजप सरकारला प्रतिसाद मिळत आहे, असे सांगत असतानाच सध्या भाजपविरोधात नाराजी आहे, मग तुमचे धोरण काय असणार, असे पत्रकारांनी विचारताच जर जनता भाजपच्या विरोधात असेल तर आम्ही जनतेसोबत असू, असे राणे म्हणाले.