कुठं इमारत नाही; तर कुठं क्रीडांगण!

By admin | Published: October 13, 2015 10:02 PM2015-10-13T22:02:23+5:302015-10-13T23:54:16+5:30

चिमुरड्यांच्या जिवाला रोजचाच धोका : शाळा क्र. ४ समोर बांधकामाच्या सळ्यांचा सापळा; दोन नंबरच्या शाळेसमोर गटार उघडे; पाच नंबर शाळेला नाही कंपाउंड--पालिकेची ‘शाळा’- तीन

Where there is no building; Where is the playground! | कुठं इमारत नाही; तर कुठं क्रीडांगण!

कुठं इमारत नाही; तर कुठं क्रीडांगण!

Next

प्रमोद सुकरे - कऱ्हाड--शहरातील नगरपालिका शाळांची अवस्था चिंताजनक आहे. यामध्ये नगरपालिकेतील सत्ताधारीच काही ‘शाळा’ करतात का? याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. पालिका प्रशासन शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी व भौतिक सुविधा पुरविण्यात कुठे तरी कमी पडत असल्याचेच मानले जाते. म्हणून तर पालिकेच्या शाळेला कुठे स्वत:ची जागा अन् इमारत नाही, तर कुठे मुलांना खेळायला क्रीडांगण नाही आणि जेथे स्वत:ची जागा, इमारत आहे, तेथे नगरपालिका शिक्षण मंडळ व शिक्षक यांचे लक्ष नाही, अशीच परिस्थिती आहे.शहराच्या मध्यवस्तीत बोरीचे परडे परिसरात पालिकेची शाळा क्रमांक दोन भरते. शाळेच्या स्वत:च्या जागेत आरसीसी पद्धतीने बांधलेली इमारत असून त्यामध्ये पंधरा वर्ग आहेत; पण शितावरून भाताची परीक्षा म्हणतात, त्याप्रमाणे या शाळेचे रंग गेलेले प्रवेशद्वार बघितले की, परिस्थिती लक्षात येते. शाळेत ७९ विद्यार्थी शिकत असून अनेक भौतिक सुविधांची वाणवा आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश घेण्यावर नक्कीच होतो.
सोमवार पेठेतील प्रशस्त समजल्या जाणाऱ्या लोकवस्तीत पालिकेची शाळा क्रमांक चार भरते. १८६९ सालची ही शाळा जुनीच मानली जाते. शाळेची इमारतही जुनी झाली आहे. सध्या येथे आठ वर्ग खोल्या असल्या तरी प्रत्यक्षात पहिली ते चौथीपर्यंतच्या शिक्षणासाठी केवळ अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने इमारत पुरेशी आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या मैदानाचा प्रश्न गंभीर आहे. पूर्वी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी थोडी जागा होती.
तेथे पाण्याची मोठी टाकी बांधण्याचे काम नगरपालिकेने हाती घेतल्याने विद्यार्थ्यांनी आता खेळायचे कोठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय सध्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू असल्याने तेथे उभ्या असलेल्या लोखंडी सळ्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत.
मार्केट यार्ड परिसरात पालिकेची शाळा क्रमांक पाच आहे. या शाळेला तर नगरपालिकेची स्वत:ची जागाच नसल्याने ऊर्दू हायस्कूलच्या इमारतीत ही शाळा भरविली जाते. त्यामुळे येथेही सुविधांचा दुष्काळ आहे. पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असूनही येथे विद्यार्थ्यांची पटसंख्या २८५ इतकी आहे.
क्रीडांगणाचा प्रश्न तर आहेच; पण शाळेभोवती साधे तारेचेही कंपाउंडही नसल्याने लहान मुले मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर वारंवार येतात,त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. मात्र, याबाबत आजपर्यंत कुणीही विचार केलेला दिसत नाही. शाळानंबर पाचला स्वत:च्या जागेमध्ये स्वमालकीची इमारत मिळेल का, हा खरा प्रश्न आहे.


म्हणे येथे शाळा क्रमांक २ भरते
शनिवार पेठेत म्हटले तर शहराच्या मध्यवर्ती वस्तीत नगरपालिकेची शाळा क्रमांक दोन भरते. येथे शाळेला चांगली इमारत आहे. म्हटले तर छोटेसे क्रीडांगणही आहे. मात्र, प्रवेशद्वारावर उभा असलेला शाळेचा रंग गेलेला फलक बघितला तर अंतरंग काय असेल याचा विचार केलेला बरा ! प्रवेशद्वारासमोरच गटाराची झालेली दुरवस्थाही विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतत आहे; पण याकडे लक्ष द्यायला
कुणाकडे वेळच नाही. त्यामुळेच इथली विद्यार्थ्यांची पटसंख्या शंभरीही पूर्ण
करू शकलेली नाही.


राजकारणातून गेल्या तीन वर्षात पालिकेच्या शाळा क्रमांक चारचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळेच विद्यार्थी पटसंख्याही घसरली आहे. क्रीडांगणाच्या जागेवर पाण्याची टाकी बांधण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या खेळण्याचा प्रश्न निर्माण झाला असून पालिकेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सोमवार पेठेत पूर्वी भरत असलेल्या मतिमंद मुलांच्या शाळेचे मैदान या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्यास प्रश्न मार्गी लागेल.
- विनायक पावसकर,
ज्येष्ठ नगरसेवक, कऱ्हाड नगरपरिषद
पालिकेने मार्केट यार्ड परिसरातील जागेतच शाळेसाठी इमारत बांधून द्यावी. कारण या ठिकाणी येथील परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. इतर ठिकाणी शाळा हलविल्यास शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर परिणाम होईल. त्याचप्रमाणे शाळेसाठी संरक्षक कंपाउंड तसेच क्रीडांगणही पालिकेने द्यावे.
- बी. एस. सुतार, शाळा क्रमांक पाच, मार्केट यार्ड


दफनभूमी बनलीय क्रीडांगण
मार्केट यार्ड परिसरात असलेल्या शाळा क्रमांक पाचमधील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त असे क्रीडांगण आहे. मात्र, ते शाळेसमोर असलेल्या दफनभूमीचे. या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी खेळत आहेत. शिवाय शाळा बंदिस्त स्वरूपात नसल्याने शाळेतील आवारात मोठ्या संख्येने कुत्र्यांचा वावर असतो. परिणामी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झालेला आहे.

Web Title: Where there is no building; Where is the playground!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.