Lok Sabha Election 2019 कष्टकरी जनतेचा आवाज आहे कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:45 AM2019-04-11T00:45:31+5:302019-04-11T00:46:00+5:30

वसंत भोसले । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्रात सतराव्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख लढत दोन आघाड्यांमध्येच आहे. एके काळी ...

Where is the voice of the working people? | Lok Sabha Election 2019 कष्टकरी जनतेचा आवाज आहे कोठे?

Lok Sabha Election 2019 कष्टकरी जनतेचा आवाज आहे कोठे?

Next

वसंत भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्रात सतराव्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख लढत दोन आघाड्यांमध्येच आहे. एके काळी अनेक मतदारसंघांत समाजवादी, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, तसेच जनता दल यांची लढत लक्षवेधी असायची. या पक्षांचे नेते शेतकरी, कामगार आणि कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे म्हणून तळपत असायचे. प्रथमच महाराष्ट्राच्या राजकारणातून समाजवादी आणि डावे पक्ष निवडणुकीच्या लढाईत कोठेही आघाडीवर नाहीत, असे स्पष्ट दिसते आहे.
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी यांच्यातच प्रमुख लढत आहे. तिसरी शक्ती नाहीच. अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित विकास आघाडीने या चारही पक्षांच्या दोन्ही गटाविरुद्ध तिसरी शक्ती उभारण्याचा प्रयत्न केला आहे. या आघाडीची पहिलीच निवडणूक आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेने लोकसभा न लढविता भाजप-शिवसेना युती विरुद्ध प्रचार करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
प्रजा समाजवादी पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष, कामगार आघाडी शेड्युल कास्ट फेडरेशन आदी पक्षांतर्फे अनेक दिग्गज उमेदवारांनी महाराष्ट्रातून निवडणुका लढविल्या आहेत, तसेच त्या जिंकून लोकसभेत राष्ट्रीय नेत्यांच्या माळेत जाऊन बसले आहेत.
डाव्या आघाडीच्या किंवा समाजवादी पक्षांच्या नेत्यांची पार्श्वभूमी ही शेतकरी, कामगार तसेच कष्टकरी समाजाच्या हक्कासाठी नेहमी असायची. श्रीपाद अृमत डांगे, जॉर्ज फर्नांडिस, दत्ता सामंत, मृणाल गोरे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी मुंबईत कामगार चळवळीच्या माध्यमातून राजकारण करीत लोकसभेत पाऊल टाकले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे सातारा आणि बीडमधून लोकसभेवर प्रतिनिधित्व केले होते. ना. ग. गोरे आणि एस. एम. जोशी या ज्येष्ठ समाजवादी मंडळींनी पुण्याचे प्रतिनिधित्व केले होते. सध्याच्या पालघर आणि पूर्वीचा डहाणू मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा दबदबा होता. लहानू कोम यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले.
रायगड लोकसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला होता. गेल्या पंधरा निवडणुकांमध्ये आघाडीवरचा पक्ष म्हणून शेकापकडे पाहिले जात होते. दि. बा. पाटील यांच्यासह अनेकांनी तेथून प्रतिनिधित्व केले. माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या विरोधातील निवडणुका गाजल्या आहेत. कोकणात पूर्वीचा राजापूर मतदारसंघ हा समाजवाद्यांचा बालेकिल्लाच होता. बॅ. नाथ पै आणि मधू दंडवते यांनी सलग दहा वेळा प्रतिनिधित्व केले आहे. मराठवाड्यातही शेकापचा परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, आदी मतदारसंघांत दबदबा होता. विदर्भात फॉरवर्ड ब्लॉकतर्फे जांबूवंतराव धोटे नागपूरमधून एकदा निवडून आले होते. वर्ध्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत साठे यांच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामचंद्र घृंगारे यांनी अनेक वेळा लढत दिली. एकदा त्यांनी वसंत साठे यांचा पराभवही केला होता.
या निवडणुकीत माकपतर्फे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातून आमदार के. सी. पडवी निवडणूक लढवित आहेत. हा अपवाद वगळता एकाही मतदारसंघातून समाजवादी किंवा डाव्या चळवळीतील उमेदवार नाहीत.
वंचित आघाडी व शेट्टी
युती आणि आघाडी वगळता अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित विकास आघाडीत काही उमेदवार विविध चळवळीशी संबंधित आहेत. स्वत: आंबेडकर अकोला आणि सोलापुरातून निवडणूक लढवित आहेत.
याउलट रिपब्लिकन पक्षांच्या एकाही गटाला युती किंवा आघाडीने उमेदवारी दिलेली नाही. शेतकरी चळवळीतून निर्माण झालेले नेतृत्व राजू शेट्टी यांचा एकमेव अपवाद आहे, अन्यथा कोणत्याही चळवळी किंवा संघटनेचे प्रतिनिधी शर्यतीत नाहीत.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे, कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस, क्रांतिसिंह नाना पाटील, आपल्या अभ्यासू संसदीय कार्याने गाजलेले प्रजा समाजवादी पक्षाचे बॅ. नाथ पै, शेतकरी कामगार पक्षाचे दि. बा. पाटील, केशवराव धोंडगे, समाजवादी नेते एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मृणाल गोरे, प्रमिलाताई दंडवते, भाई उद्धवराव पाटील, प्रा. मधू दंडवते, बापू काळदाते, रामचंद्र श्रृंगारे, श्यामराव परुळेकर, लहानू कोम, आनंदराव चव्हाण, डॉ. दत्ता सामंत, अहिल्याबाई रांगणेकर, भाऊराव गायकवाड आदी दिग्गज महाराष्ट्रातून निवडून येत होते.

Web Title: Where is the voice of the working people?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.