Kolhapur- विशाळगड जाळपोळ प्रकरण: घरे जळत असताना पालकमंत्री कोठे होते.?, इंडिया आघाडीच्या बैठकीत विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 03:33 PM2024-07-18T15:33:58+5:302024-07-18T15:34:31+5:30
संभाजीराजेंकडून एकीला कलंक
कोल्हापूर : रोम जळत असताना निरो फिडल वाजवित होता, इथे विशाळगडाजवळील घरे जळत होती तेंव्हा आमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ कोठे होते? अशी विचारणा बुधवारी येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आली. विशाळगड परिसरातील हिंसाचाराकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मुश्रीफ यांचा बैठकीत निषेध करण्यात आला. ते आमच्या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून नकोत, अशीही भावना व्यक्त झाली.
मुस्लीम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी यांनी सुरुवातीलाच “हसन मुश्रीफ हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी विशाळगड प्रकरणात लक्ष घालायला पाहिजे होते. सर्व आमदार, खासदार यांची बैठक आयोजित करायला पाहिजे होती. त्यांची ती नैतिक जबाबदारी होती. हिंसाचार झाल्यानंतर तरी समाजातील लोकांना भेटून त्यांची विचारपूस करायला पाहिजे होती, ती त्यांनी केली नाही,” याबाबत खंत व्यक्त करीत मुश्रीफ यांचा निषेध केला.
बाबा इंदूलकर म्हणाले, “रोम जळत असताना निरो फिडल वाजवित होता. इथे कोल्हापुरात विशाळगडावरील घरे जळत होती तेंव्हा आमचे पालकमंत्री कुठे होते..?”
“समाजात कितीही दुही माजविण्याचा प्रयत्न झाला तरी आपण एकत्र राहून एक सकारात्मक चित्र समाजापुढे नेऊ या,” असे आवाहन मेघा पानसरे यांनी केले. “त्यांचा राजकीय हेतू दंगली घडविण्याचा असला तरी त्याच्या विरोधात आपणाला दीर्घकाळ सामाजिक चळवळ चालवावी लागेल,” असे चंद्रकांत यादव यांनी सांगितले.
संभाजीराजेंकडून एकीला कलंक
संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरातील एकीला जो कलंक लावला आहे, तो पुसण्यासाठी खासदार शाहू छत्रपती यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना आपणही मदत करू या, असे आवाहन सतीश कांबळे यांनी केले. संभाजीराजेंच्या भूमिकेवर सुभाष जाधव यांनीही टीका केली. त्यांची भूमिका टोकाची आहे. समाजात फूट पाडण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे. पोलिस अधीक्षकांची भूमिकाही शंकास्पद आहे, त्यांनाही त्यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला पाहिजे, असे जाधव यांनी सांगितले.