आमदारकीपेक्षा पूरग्रस्तांना मदत मिळणार की नाही, हा विषय महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:29 AM2021-09-05T04:29:08+5:302021-09-05T04:29:08+5:30

: इचलकरंजीचा पाणीप्रश्न सोडवणे कुण्या बाजारबुणग्याचे काम नाही : इचलकरंजीत पदयात्रेचे जल्लोषी स्वागत इचलकरंजी : राजू शेट्टींचे १२ आमदारांच्या ...

Whether the flood victims will get help or not is more important than the legislature | आमदारकीपेक्षा पूरग्रस्तांना मदत मिळणार की नाही, हा विषय महत्त्वाचा

आमदारकीपेक्षा पूरग्रस्तांना मदत मिळणार की नाही, हा विषय महत्त्वाचा

Next

: इचलकरंजीचा पाणीप्रश्न सोडवणे कुण्या बाजारबुणग्याचे काम नाही :

इचलकरंजीत पदयात्रेचे जल्लोषी स्वागत

इचलकरंजी : राजू शेट्टींचे १२ आमदारांच्या यादीत नाव आहे किंवा नाही, यापेक्षा सध्या माझ्या दृष्टीने पूरग्रस्तांना मदत मिळणार की नाही? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यावर भाष्य करावे, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. तसेच इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर कटकारस्थान करून मला खलनायक केले. ते आता निवडणूक झाल्यानंतर कुठे गेले असा सवाल करत शहराचा पाणीप्रश्न सोडवण्याचे काम कुण्या बाजारबुणग्यांचे नाही, हा प्रश्न सोडवण्यासाठी मलाच संघर्ष करावा लागणार आहेे, असे स्पष्ट केले.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेली आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची ही पदयात्रा पट्टणकोडोली, रुई, चंदूरमार्गे शनिवारी सायंकाळी इचलकरंजीत आली. येथील तीन बत्ती चौकात या पदयात्रेचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही पदयात्रा मुख्य मार्गावरून गावभागातील महादेव मंदिर चौकात पोहोचल्यावर त्याचे सभेत रूपांतर झाले. ४ दिवसांपासून शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी ही पदयात्रा सुरू असली तरी जिल्हाधिकारी, मंत्री अथवा राज्य शासनाकडून साधी विचारपूसही झाली, मात्र मी सत्तेत नसताना पदयात्रेदरम्यान सर्वच ठिकाणी झालेले स्वागत सरकारला चपराकच आहे.

पंतप्रधानांनी गुजरातच्या आपत्ती निवारणासाठी १ हजार कोटी रुपये दिले; मात्र त्यांना महाराष्ट्र आणि कोकणातील पूरग्रस्त का दिसले नाहीत? केंद्राचे पथक गुजरातला तातडीने पोहोचले; मात्र महाराष्ट्रात ते का आले नाहीत?, आपत्तीच्या काळातही महाराष्ट्र आणि गुजरात असा भेदभाव का?

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी मी अनेकांचे उंबरे झिंजवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी सूचक म्हणूनही चालतो. मात्र पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे १ मिनीट वेळ नाही, ही शोकांतिका आहे. सरकारकडे बुडव्यांना देण्यासाठी पैसे आहेत; मात्र पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी, शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी निधी नाही. सरकारला ही भूमिका महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शहराध्यक्ष रामदास कोळी, गोवर्धन दबडे, दीपाली बेडक्याळे, राजवर्धन नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर ही पदयात्रा शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथे मुक्कामी गेली.

चौकट - केंद्राकडून महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाबाबत महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांपैकी कोणीच काही बोलत नाही. कारण, बोलले की त्यांच्यामागे ईडी, सीबीआय लागते, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

फोटो ओळी

1) इचलकरंजी येथील सभेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रामदास कोळी, गोवर्धन दबडे, दीपाली बेडक्याळे, राजवर्धन नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

2) इचलकरंजीत पदयात्रेचे जल्लोषी स्वागत करण्यात आले, यावेळी कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टीही केली.

Web Title: Whether the flood victims will get help or not is more important than the legislature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.