नेत्यांचे कोणत्या प्रकल्पात किती पैसे गुंतलेत याचे बिंग फोडणार, राजू शेट्टींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 11:21 AM2022-03-01T11:21:02+5:302022-03-01T11:21:57+5:30

शासनाच्या कंपन्या बंद पाडून या कंपन्या विकत घेण्याचे काम नेत्यांनी सुरू केले आहे; परंतु ते हाणून पाडावे लागेल.

Which leaders in the state will be bombarded with how much money is involved in which project, Raju Shetty founder of Swabhimani Shetkari Sanghatana gave a warning | नेत्यांचे कोणत्या प्रकल्पात किती पैसे गुंतलेत याचे बिंग फोडणार, राजू शेट्टींचा इशारा

नेत्यांचे कोणत्या प्रकल्पात किती पैसे गुंतलेत याचे बिंग फोडणार, राजू शेट्टींचा इशारा

Next

कोल्हापूर : साखर कारखान्यांमधून शेतकऱ्यांना लुटून झाल्यानंतर आता या पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोरांनी वीज प्रकल्पाच्या माध्यमातूनही पैसे लुटायला सुरुवात केली आहे. राज्यातील कोणत्या नेत्यांचे कोणत्या प्रकल्पात किती पैसे गुंतलेत याचे बिंग आठवडाभरात फोडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला आहे.

शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा या मागणीसाठी येथील महावितरणच्या कार्यालयासमोर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सलग सातव्या दिवशी सोमवारी आंदोलन सुरू होते. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शेट्टी बोलत होते. शुक्रवारपर्यंत जर याबाबत निर्णय झाला नाही, तर शुक्रवारनंतरचे आंदोलन वेगळे आणि आक्रमक असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

ते म्हणाले, एक वीज प्रकल्प उभारण्यासाठी १५ ते २० कोटी रुपयांचा खर्च येतो. हीच वीज महावितरणाला विकून वर्षभरात हा पैसा वसूल होतो. त्यापुढे वीस वर्षे शेतकऱ्यांना लुटले जाते. शासनाच्या कंपन्या बंद पाडून या कंपन्या विकत घेण्याचे काम नेत्यांनी सुरू केले आहे; परंतु ते हाणून पाडावे लागेल.

विधानसभेचे अधिवेशन आता सुरू होणार आहे. हसन मुश्रीफ, सतेज पाटील हे दोन मंत्री मला भेटून गेले आहेत. त्यांनी दोन दिवस थांबायला सांगितले आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत वाट पाहणार आहे; परंतु जर तोपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मात्र यापुढचे आंदोलन उग्र असेल. आम्ही निवडून दिलेले आमदार जर या विषयावर अधिवेशनात तोंड उघडणार नसतील तर त्यांनासुद्धा गाव बंद केले जाईल, असाही इशारा शेट्टी यांनी दिला.

सोमवारी दिवसभरात अनेक कार्यकर्त्यांनी शेट्टी यांना पाठिंबा दिला. शियेच्या सरपंच रेखा जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ शेट्टी यांना भेटले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून पाठिंबा व्यक्त केला. यावेळी प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, तानाजी देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बारामतीत आंदोलन करायचे विसरलो नाही

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान देणे अजून शिल्लक आहे. जर या अधिवेशनात ही तरतूद झाली नाही तर बारामतीत आंदोलन करायचे आम्ही विसरलेलाे नाही, असेही शेट्टी म्हणाले.

चांदोलीतून पाणी सोडण्यासाठी मंत्रालयातून फोन

चांदोली धरणाखालील शासनाचा विद्युत प्रकल्प गेले आठ महिने बंद होता. मी १५ फेब्रुवारीला विचारल्यानंतर तो सुरू करण्यात आला. तेथून आता आठ मेगावॅट वीज तयार झाली आहे. मग तिथला शासनाचा प्रकल्प बंद आणि ‘महती’ कंपनीचा सुरू हे कोणाच्या फायद्यासाठी होते. या कंपनीचा मालक कोण आहे, हे अजित पवार यांना चांगले माहिती आहे. मीही माहिती घेतोय. ‘महती’ला वीज तयार करता यावी म्हणून जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयातून कोणी फोन केले हे मोबाइलचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर उघड होईल, असेही शेट्टी म्हणाले.

...तर सर्व खटले माेफत लढू

शेट्टी यांच्या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. एवढेच नव्हे, तर ही रास्त मागणी करताना जर खटले दाखल केले गेले तर सर्व खटल्यांचे कामकाज वकील मोफत करतील, अशी ग्वाहीही शिष्टमंडळाने दिली. अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, सचिव ॲड. विजयकुमार ताटे, देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बाकीचे आमदार कुठे गेले

हसन मुश्रीफ, सतेज पाटील हे दोन मंत्री आणि विनय कोरे, राजू आवळे हे दोन आमदार आंदोलनस्थळी भेटून गेले. बाकीचे आमदार आहेत कुठे अशी विचारणा शेट्टी यांनी केली. महाशिवरात्रीला आमदार गावातच थांबणार आहेत. तेव्हा त्यांना याबाबत जाब विचारा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Web Title: Which leaders in the state will be bombarded with how much money is involved in which project, Raju Shetty founder of Swabhimani Shetkari Sanghatana gave a warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.