रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी अचानकपणे सुटून तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:24 AM2021-04-25T04:24:52+5:302021-04-25T04:24:52+5:30
हुपरी : वडिलांची लोड असलेली रिव्हॉल्व्हर साफ करताना रिव्हॉल्व्हरमधील गोळी अचानकपणे सुटून हुपरी (ता. हातकणंगले) येथील चांदी उद्योजकाचा तरुण ...
हुपरी : वडिलांची लोड असलेली रिव्हॉल्व्हर साफ करताना रिव्हॉल्व्हरमधील गोळी अचानकपणे सुटून हुपरी (ता. हातकणंगले) येथील चांदी उद्योजकाचा तरुण मुलगा ठार झाल्याची धक्कादायक घटना शनिवार दुपारी घडली. सागर सुनील गाट (वय २७, रा. शांतीनगर) असे या तरुणाचे नाव आहे. सागर यांचा मुलगा सिद्ध याच्या शनिवारी होणाऱ्या पहिल्याच वाढदिवसादिवशी सागर यांचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळही उडाली आहे.
येथील यशवंतनगर (चांदीनगर) वसाहतीनजीकच शांतीनगर वसाहत आहे. या वसाहतीत सुनील विद्याधर गाट हे चांदी उद्योजक आपल्या दोन मुलांसह राहतात. अत्यंत सुखी व संपन्न असे हे कुटुंब आहे. सागरचे वडील सुनील हे चांदी दागिन्याच्या व्यापारानिमित्ताने राजस्थान बाजारपेठेत गेले होते. ते आठ दिवसांपूर्वीच घरी परतले आहेत. त्यावेळी लोड करण्यात आलेली रिव्हॉल्व्हर तशीच लोड अवस्थेत राहून गेली होती. ही लोड असलेली रिव्हॉल्व्हर सागर साफ करीत असतानाच अचानकपणे रिव्हॉल्व्हरमधील गोळी सुटून सागर गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच नियतीने अखेर डाव साधला व त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने हुपरी शहर सुन्न झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना समजताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी यादव, पोलीस उपनिरीक्षक मस्कर आदी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची माहिती घेत जाबजबाब घेण्याचे काम सुरू केले.
: चौकट :
संरक्षणासाठी घेतलेल्या रिव्हॉल्व्हरनेच घात
1) सुनील गाट हे चांदी उद्योजक असून चांदी दागिने घेऊन ते परराज्यांतील बाजारपेठेवर जात असतात. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी त्यांच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होती. त्याच रिव्हॉल्व्हरने त्यांच्या सागर यांचा घात झाला.
2) सागर यांचा मुलगा सिद्ध याचा शनिवारी पहिलाच वाढदिवस होता. मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरात सर्वत्र धावपळ व आनंदी वातावरण होते. दरम्यानच्या कालावधीत ही घटना घडल्याने घरातील आनंदी वातावरणावर क्षणात दुःखाची छाया पसरली गेली.
फोटो -सागर सुनील गाट