डेंग्यू, चिकूनगुनिया वाढत असताना प्रभावी उपाययोजना राबविण्यात हयगय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:30 AM2021-09-08T04:30:13+5:302021-09-08T04:30:13+5:30
कोल्हापूर : शहरात डेंग्यू, चिकूनगुनियाचे रुग्ण वाढत असताना पालिका आरोग्य विभाग मात्र त्याविरोधात व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम राबविताना दिसत ...
कोल्हापूर : शहरात डेंग्यू, चिकूनगुनियाचे रुग्ण वाढत असताना पालिका आरोग्य विभाग मात्र त्याविरोधात व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम राबविताना दिसत नाही. मंगळवारी केवळ तीन प्रभागांतील १२७ घरांचे सर्वेक्षण झाले यावरूनच मोहिमेतील उणिवा जाणवत आहेत.
लसीकरणाची मोहीम अधिक व्यापक केल्याचे सांगणाऱ्या महापालिका आरोग्य विभागाचे डेंग्यू, चिकूनगुनियाच्या साथीकडे दुर्लक्ष झाले आहे. मंगळवारी तीन प्रभागांत १२७ घरांचे सर्व्हेक्षण करताना २८६ कंटेनरचे तपासण्यात आले. त्यावेळी आठ ठिकाणी डास अळी सापडल्या. कीटकनाशक विभागाकडून दैनंदिन औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात आली.
ही औषध फवारणी २६ स्प्रे पंप, ६ धूर फवारणी मशिन, ३ ट्रॅक्टर व २५ कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात आली. तसेच दूषित पाण्याच्या ठिकाणी असलेल्या टायरी जप्त करून पाण्याच्या ठिकाणी गप्पी मासे कर्मचाऱ्यांमार्फत सोडण्यात आले.
शहरातील नागरिकांनी डेंग्यू, चिकनगुनियाची लक्षणे आढळल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागास अथवा शासकीय रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा, सेप्टीक टँक व्हेंट पाईपला जाळी बसविणेत यावी, आठवड्यामध्ये एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा, फ्रिजमधील डिफ्रॉस स्ट्रेमधील पाणी आठ दिवसांतून एकदा रिकामे करण्यात यावे, घराजवळील परिसरामध्ये रिकामे टायर, नारळाच्या करवंट्या, डबे इत्यादीमध्ये पाणी साचू देऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.