Kolhapur news: गणेशमूर्ती विसर्जन करायला गेला, पाय घसरुन युवक कृष्णा नदीत बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 03:42 PM2023-09-27T15:42:39+5:302023-09-27T16:08:39+5:30
गणपती कोळी कुरुंदवाड: गणेशमूर्ती विसर्जन करताना बंधाऱ्यावरुन पाय घसरून कृष्णा नदी पात्रात पडल्याने गणेशभक्ताचा बुडून मृत्यू झाला. विनायक रुकमना ...
गणपती कोळी
कुरुंदवाड: गणेशमूर्ती विसर्जन करताना बंधाऱ्यावरुन पाय घसरून कृष्णा नदी पात्रात पडल्याने गणेशभक्ताचा बुडून मृत्यू झाला. विनायक रुकमना आवटी (वय ३९) असे मृत तरुणाचे नाव आहे. काल, मंगळवारी रात्री एकच्या सुमारास राजापूर बंधाऱ्यावर ही घटना घडली.
गावातील वंदे मातरम् गणेश मंडळाची काल, मंगळवारी विसर्जन मिरवणूक होती. मिरवणूक संपवून राजापूर बंधाऱ्यावर विसर्जन करताना गणेशमुर्ती बरोबर तोल जावून विनायक व तमन्ना तोडकर दोघेही पात्रात पडले. तोडकरला पोहता येत असल्याने तो सुखरूप बाहेर आला. मात्र विनायकला पोहता येत असतानाही दम भरल्याने त्याचा बूडून मृत्यू झाला.
विनायक बुडत असल्याचे समजताच सार्थक हिंगमिरे, अमित कोरे, प्रशांत चौगुले, प्रवीण चौगुले यांनी पात्रात उडी घेऊन त्याला बाहेर काढले व सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विनायक उच्च शिक्षित असून व्यंकटेश शुगर्स (बेडकिहाळ, कर्नाटक) येथे स्लीप बॉय म्हणून नोकरीला होता. त्याच्या अपघाती निधनामुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.