मानधनवाढीसह 'मनस्ताप'ही; अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भावना 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 04:23 PM2024-10-11T16:23:45+5:302024-10-11T16:24:19+5:30

शासनाच्या अन्य योजनांची कामे करण्याचीही सक्ती

While increasing the remuneration of Anganwadi workers and helpers, the working time has also been increased by 2 hours | मानधनवाढीसह 'मनस्ताप'ही; अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भावना 

मानधनवाढीसह 'मनस्ताप'ही; अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भावना 

कोल्हापूर : राज्य शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात अनुक्रमे ३ हजार व २ हजारांची वाढ करताना त्यांच्या कामाच्या वेळातही २ तासांची वाढ केली. प्रोत्साहन भत्ता देताना एवढ्या अटी घातल्या आहेत की, हा भत्ता त्यांना कसा मिळू नये, अशीच व्यवस्था केली असल्याची या कर्मचाऱ्यांची भावना आहे. त्यामुळे पुन्हा संघर्ष करावा लागणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मुळातच या कर्मचाऱ्यांना जे मासिक मानधन दिले जाते ते कधीच नियमित नसते. शासकीय कर्मचाऱ्यांना, बँक नोकरांना, प्राध्यापकांचा पगार एकही दिवस पुढेमागे होत नाही; परंतु या श्रमजीवी घटकाला मात्र त्यांच्या कष्टाचे मानधन शासन एका विशिष्ट तारखेला कधीच देत नाही. ५ हजार मानधनवाढ करावी म्हणून ५२ दिवस संप केला; परंतु तरीही सरकारला फारसा पाझर फुटला नाही. निवडणुका तोंडावर असल्यानेच आता ४ ऑक्टोबरला शासन आदेश काढून ३ हजार मानधन वाढ आणि २ हजार भत्ता वाढ जाहीर केला आहे; परंतु हा भत्ता मिळताना त्यासाठी १० अटी घातल्या आहेत.

त्या पूर्ण केल्या तरच हा वाढीव भत्ता मिळणार आहे. त्या अटी व्यवहार्य नसल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. खुजी, स्थूल आणि लठ्ठ मुलांचे प्रमाण कमी करणे, अशी एक अट आहे. खुज्या मुलांची उंची सेविका कशी वाढवणार, असा त्यांना पडलेला प्रश्न आहे. महिन्यातून किमान २५ दिवस ताजा व गरम खाऊ द्यावा, असे म्हटले आहे; परंतु सुटी, आजारपण यामुळे ते मूल आलेच नाही तर त्यास सेविका काय करणार, याचे उत्तर नाही. शासनाच्या अन्य योजनांची कामे करण्याचीही सक्ती केली आहे. बीटची सरासरी काढून ती चांगली असेल तर भत्ता मिळणार आहे. म्हणजे जाहीर केलेला लाभ कसा मिळणार नाही, अशी व्यवस्था केली आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना अपेक्षित मानधन वाढ मिळाली नाही. पेन्शन, ग्रॅच्युइटीचा निर्णयच सरकारने घेतला नाही. प्रोत्साहन भत्ता देतानाही तो कसा मिळणार नाही, अशाच अटी घातल्या आहेत. त्यामुळे सरकारविरुद्धचा संघर्ष यापुढेही करावाच लागेल. - सुवर्णा तळेकर, सचिव, कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी महासंघ, कोल्हापूर.

दृष्टिक्षेपात राज्यातील अंगणवाडी संख्या

  • एकूण प्रकल्प ५५३
  • अंगणवाडी सेविका : ११०५५६
  • मदतनीस : ११०५५६
  • मानधन हिस्सा : केंद्र शासन - ६० टक्के, राज्य शासन - ४० टक्के
  • कोल्हापूर जिल्ह्यातील सेविका-मदतनीस : ८५००


किती झाली मानधनवाढ

  • अंगणवाडी सेविका : ३०००
  • मदतनीस : २०००


प्रोत्साहन भत्ता-निकष पूर्ण झाल्यासच

  • सेविका : १६०० ते २०००
  • मदतनीस : ८०० ते १०००

Web Title: While increasing the remuneration of Anganwadi workers and helpers, the working time has also been increased by 2 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.