व्हॅन रस्त्यातच बंद पडली, आरोपींसह पोलिसांची कोर्टापर्यंत पायपीट, कोल्हापूर पोलिसांचा भोंगळ कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 06:53 PM2022-11-24T18:53:31+5:302022-11-24T18:53:57+5:30
अशावेळी एखाद्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली असती तर अनर्थ घडला असता.
कोल्हापूर : मोक्का कारवाईत जामीन मिळालेल्या इचलकरंजीतील गुंडाचे मिरवणुकीने स्वागत केल्याप्रकरणी अटकेतील पाच संशयितांना बुधवारी (दि. २३) जुना राजवाडा पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले. जिल्हा न्यायालयाकडे जाताना सेंट झेवियर्स हायस्कूलसमोर आरोपींना घेऊन जाणारी पोलिस व्हॅन बंद पडली आणि पोलिसांना आरोपींसह जिल्हा न्यायालयापर्यंत पायपीट करावी लागली. या घटनेमुळे जुना राजवाडा पोलिसांचा भोंगळ कारभार समोर आला.
मोक्का कारवाईत कळंबा कारागृहात रवानगी झालेला इचलकरंजीचा गुंड अजित नाईक याची जामिनावर सुटका झाल्यानंतर ३५ ते ४० जणांनी त्याचे मिरवणुकीने स्वागत केले. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर संशयितांमधील पाच जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी (दि. २२) अटक केली.
शुभमकुमार कदम (वय २३, रा. कसबा आळते, ता. हातकणंगले), सूरज महादेव पाटील (वय २६, रा. इचलकरंजी), अनिकेत वसंतराव नरळे (वय २१, रा. इचलकरंजी), साजिद ऊर्फ टिपू दस्तगीर नाईक (वय ३०, रा. शाहूनगर, कागल) आणि गणेश सुरेश आडेकर (वय २६, रा. इचलकरंजी) या अटकेतील संशयितांचा ताबा जुना राजवाडा पोलिसांकडे देण्यात आला.
अटकेतील संशयितांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यासाठी जुना राजवाडा पोलिस व्हॅनमधून निघाले होते. सेंट झेवियर्स हायस्कूलसमोर पोहोचताच पोलिसांची व्हॅन बंद पडली. चालकाने व्हॅन दुरुस्तीचा प्रयत्न केला; मात्र व्हॅन दुरुस्त झाली नाही. अखेर बेडीबंद आरोपींना घेऊन पोलिसांनी कोर्टापर्यंत पायपीट केली. सुमारे दोन किलोमीटर अंतर चालत आरोपी आणि पोलिस कोर्टात पोहोचले. न्यायाधीशांनी अटकेतील संशयितांची पोलिस कोठडीत रवानगी केली. दरम्यान, गुंडाचे मिरवणुकीने स्वागत करणाऱ्या आणखी सात जणांना जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली.
पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर
ऐनवेळी व्हॅन बंद पडल्यानंतर दुसरे वाहन बोलावून आरोपींना कोर्टात हजर करता आले असते; मात्र पोलिसांनी पायपीट करत कोर्ट गाठले. अशावेळी एखाद्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली असती तर अनर्थ घडला असता.