चरखुदाईनंतरही गव्यांचा धुमाकूळ

By admin | Published: April 7, 2017 01:04 AM2017-04-07T01:04:23+5:302017-04-07T01:04:23+5:30

चिकोत्रा प्रकल्प परिसर : पिकांचे नुकसानीचे सत्र सुरूच; शेतकरी त्रस्त

The whistle after the spinning wheel | चरखुदाईनंतरही गव्यांचा धुमाकूळ

चरखुदाईनंतरही गव्यांचा धुमाकूळ

Next



उत्तूर : आजरा तालुक्यातील महागोंड व पेरणोली या डोंगर कपारीतून व बेडीव व भुदरगड किल्ला येथून गव्यांचा कळप रात्री चिकोत्रा प्रकल्प परिसरात येतो. वनविभागाने चर खुदाई केली असली तरी गव्यांचा धुमाकुळ काही केल्या संपेनासा झाला आहे. रात्रीच्या वेळेस पिकांचे नुकसान हा चिंतेचा विषय बनला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, आजरा हद्दीतील चिमणे, महागोंड, पेरणोली परिसराला लागून असणाऱ्या व गव्यांचा उपद्रव असणाऱ्या या ठिकाणी चरखुदाई केली आहे. मात्र, पाच वर्षांपूर्वी वनविभागाने केलेली चरखुदाई आता बुजली आहे. त्यामुळे गवे सहजरीत्या चिकोत्रा प्रकल्पाकडे येत आहेत.
आजरा व भुदरगड हद्दीतील मोठ्या जंगलांना वणवा लागल्यामुळे गव्यांना खाण्यासाठी चारा नाही. चिकोत्रा प्रकल्प परिसरात ऊस, उन्हाळी भुईमूग, कडधान्ये, आदी पिके असल्याने गवे रात्रीच्या वेळी येत आहेत. शेतकरी शेतात जागरण करीत आहेत. मात्र, गव्यापुढे ते हतबल होत आहेत. रात्रभर पीक फस्त करून प्रकल्पातील पाणी पिऊन पहाटे पेरणोली, भुदरगडच्या जंगलात आसरा घेत आहेत.
नोव्हेंबर महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत गव्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस गव्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर वनगाई, रानडुक्कर, मोर या प्राण्यांकडूनही नुकसान होत आहे. बागायत शेती असून नसल्यासारखी आहे. चरखुदाई ही तीन ते चार फूट केली जाते. मात्र, जमिनीच्या धुपीमुळे ती बुजते. त्यामुळे गवे पुन्हा येऊ लागले आहेत. या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी चिकोत्रा प्रकल्पातील शेतकरी वर्गातून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The whistle after the spinning wheel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.