‘व्हाईट आर्मी’च्या आदम मुल्लाणींच्या परिवारास लाखाचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 06:01 PM2022-07-02T18:01:35+5:302022-07-02T18:07:42+5:30
मुल्लाणी यांच्या अपघाती निधनानंतर ‘लोकमत’ने याबाबत आवाहन केले होते. ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मशताब्दीच्या प्रारंभ दिनाचे औचित्य साधून शाहू छत्रपती यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आला.
कोल्हापूर : महापुराच्या काळात ‘देवदूत’ म्हणून काम करणाऱ्या ‘व्हाईट आर्मी’चे जवान आदम मुल्लाणी यांच्या परिवारास मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने १ लाख रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला. मुल्लाणी यांच्या अपघाती निधनानंतर ‘लोकमत’ने याबाबत आवाहन केले होते. ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मशताब्दीच्या प्रारंभ दिनाचे औचित्य साधून शाहू छत्रपती यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आला.
आदम यांची सातवीतील मुलगी नाझिया आणि मुलगा आदनान यांच्या नावावर प्रत्येकी ५० हजार रुपयांची ठेवपावती ठेवणार असल्याचे रोकडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रशांत शेंडे, सौरभ पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार सतेज पाटील, लोकमतचे संपादक वसंत भोसले, आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, अशोक रोकडे, अरुणकुमार डोंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करणारे आदम हे अनेक वर्षे व्हाईट आर्मीचे आघाडीचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. २०१९ च्या महापुरात स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांनी १५ दिवस पूर्णवेळ मदतकार्य केले होते. भरपुरामध्ये यांत्रिकी बोट चालवत रुग्णांना ने-आण करण्यापासून ते ग्रामस्थांना मदत पोहोचवण्यापर्यंतची कामगिरी ते रोज करत होते.
आदम हे १५ मार्च २०२० रोजी खासगी गाडी घेऊन कर्नाटकमधील हसन जिल्ह्याकडे जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. २० मार्चला ‘लोकमत’ने ‘कोल्हापूरच्या महापुरातील देवदूताचा संसार पडला उघड्यावर’ असे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत अनेक स्वयंसेवी संस्थांनी या परिवाराला मदत करण्याचा निर्णय घेतला. पुणे येथील मृत्युंजय प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष आणि मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या पत्नी मृणालिनी सावंत आणि कार्यकारी विश्वस्त डॉ. सागर देशपांडे यांनी या परिवाराला लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या कालावधीमध्ये हा धनादेश देणे प्रलंबित होते.