महाड इमारत दुर्घटना : व्हाईट आर्मीकडून नऊ जखमींसह १७ मृतदेहांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 03:53 PM2020-08-27T15:53:10+5:302020-08-27T15:54:33+5:30
आपत्ती कोणतीही येऊ दे, मग ती राज्यात असो वा परराज्यात; त्यासाठी कोल्हापूरची व्हाईट आर्मी मदत व शोधकार्यात अग्रेसर असते. तीन दिवसांपूर्वी महाड (रायगड) येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेतील नऊ जखमींना शोधण्याचे व १७ मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्याचे महत्त्वपूर्ण काम या आर्मीच्या पथकाने केले.
कोल्हापूर : आपत्ती कोणतीही येऊ दे, मग ती राज्यात असो वा परराज्यात; त्यासाठी कोल्हापूरची व्हाईट आर्मी मदत व शोधकार्यात अग्रेसर असते. तीन दिवसांपूर्वी महाड (रायगड) येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेतील नऊ जखमींना शोधण्याचे व १७ मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्याचे महत्त्वपूर्ण काम या आर्मीच्या पथकाने केले.
महाड येथील इमारत दुर्घटनेत शंभरहून अधिक रहिवासी अडकले होते. त्यात पहिल्या दिवशी अनेकजणांना एनडीआरएफसह कोल्हापूरच्या व्हाईट आर्मीच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. यात व्हाईट आर्मीच्या विनायक भाट याने मोहम्मद बागी या सहा वर्षांच्या मुलास १९ तासांनी व ५५ वर्षांच्या महिलेस सुखरूप बाहेर काढले.
मंगळवारी (दि. २५) एकूण सातजणांना असे एकूण नऊजणांना जिवंत शोधून बाहेर काढले; तर जेसीबीच्या साहाय्याने उत्कृष्ट व्यवस्थापन करीत १७ मृतदेह बाहेर काढले. बुधवारी सकाळी अखेरचा मृतदेह काढून हे पथक रात्री उशिरा कोल्हापूरला परत आले. या शोधकार्यात व्हाईट आर्मीच्या जवानांनी इमारतीचा नकाशा व ज्या जिन्यातून अनेक रहिवासी बाहेर पड़ले, त्यांचा शोध योग्य पद्धतीने घेतला. त्यामुळे नऊजणांना वाचविण्यात व १७ मृतदेह विटंबना न होता बाहेर काढण्यात यश आले.
एकूण ४० तास सुरू असलेली ही शोधमोहीम बुधवारी सकाळी बंद करण्यात आली. या शोधकार्यात आर्मीचे प्रदीप ऐनापुरे, नीतेश वनकोरे, विनायक भाट, सुधीर गोरे, नीलेश वनकोरे, प्रेम सातपुते, सुमित साबळे, नितीन लोहार, विकी निर्मळे, आकाश निर्मळे, ओंकार पाटील, अक्षय पाटील, केतन म्हात्रे, शालम आवळे, सिद्धेश पाटील यांनी सहभाग घेतला.