वीज उपकेंद्र ठरतेय पांढरा हत्ती
By admin | Published: November 3, 2014 09:25 PM2014-11-03T21:25:04+5:302014-11-03T23:31:48+5:30
बोलोली उपकेंद्र : कोट्यवधी रुपये खर्चातून उभारलेले उपकेंद्र्र बंदच
मच्छिंद्र मगदूम- सांगरूळ -बोलोली (ता. करवीर) येथे बारा वाड्यांचा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उपकेंद्र्र सुरू केले आहे. याठिकाणी कळे येथून आसगाव उपकेंद्रावरून नवीन विजेची लाईन जोडली आहे; पण या लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या लाईनच्या तारांना जोडलेले इन्शोलेशन (चिनी मातीच्या प्लेट) वारंवार फुटत आहेत. परिणामी,
लाईन नेहमी बंदच असते. यामुळे बोलोली सबस्टेशन पांढरा हत्ती ठरत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून उपकेंद्र्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
महावितरण कंपनीने कळे असगाव येथून २० किलोमीटरनंतर नवीन लाईन टाकून बोलोली येथे ३३ केव्ही सबस्टेशन उभारले. सबस्टेशनच्या मुहूर्तापासून या लाईनमध्ये बिघाड असून, गेली दीड वर्षे हे काम महावितरण कंपनीला सुरळीत करता आलेले नाही. सध्या कोगे सबस्टेशनवरून लाईट जोडली आहे; पण यामुळे लोडशेडिंग वाढत आहे. कळे येथून वीजपुरवठा सुरू केल्यानंतर पोलवरील इन्शोलेशन फुटण्याचे सत्र गेले दीडवर्ष सुरू आहे. महावितरण कंपनी यांची ट्रायल आणखी किती वर्षे घेणार, अशी विचारणा शेतकरीवर्गांतून होत आहे.
गेले तीन महिने हे काम पूर्णपणे बंदच आहे. ही लाईन सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर तासभरसुद्धा लाईन सुरू राहत नाही. यामुळे कळे येथून आणलेली लाईन नेहमी बंदच असते. विजेचे भारनियमन वाढत असल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे उपकेंद्र्र व लाईनच्या कामाची चौकशी व्हावी व शेती पंपासाठी पूर्ण क्षमतेने वीज मिळावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांतून जोर धरत आहे.
बोलोली उपकेंद्राचीची कळे ते बोलोली लाईनची तातडीने दुरुस्ती करावी, भारनियमन रद्द करून शेतीसाठी १२ तास वीज द्यावी व उपवडे तलावातील पाणी सोडलेल्या वेळेतच वीजपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन छेडू.
- प्रकाश पाटील, उपसरंपच, आमशी.