शिरोळमध्ये रस्ते सुरक्षिततेसाठी पांढरे पट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:41 AM2021-02-18T04:41:54+5:302021-02-18T04:41:54+5:30
शिरोळ : रस्ते सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. गेल्या आठवड्यात अपघाताच्या वारंवार घटना घडल्याने दत्त ...
शिरोळ : रस्ते सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपाययोजना राबविल्या जात आहेत. गेल्या आठवड्यात अपघाताच्या वारंवार घटना घडल्याने दत्त कारखाना ते पद्माराजे विद्यालयाजवळील वन-वे रोडवर पांढरे पट्टे मारण्यास सुरुवात करण्यात आली. उशिरा का होईना अपघात टाळण्यासाठी उपाययोजना झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्यादेखील वाढत चालली आहे. रस्ते कमी आणि वाहने जास्त अशी परिस्थिती आहे. सध्या गळीत हंगाम सुरू असल्याने ऊस वाहतूक सुरू आहे. त्यातच गौण खनिज वाहतूक करणारी वाहने, पर्यटनाला येणारी वाहने त्यामुळे वाहतूक कोंडीबरोबर अपघातालाही निमंत्रण मिळत आहे. दत्त कारखाना प्रवेशद्वार ते जनता हायस्कूलपर्यंत ठिकठिकाणी रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. अपघाताच्याही चार घटना घडल्यानंतर बुधवारी बांधकाम विभागाकडून या मार्गावर रस्ता सुरक्षिततेसाठी पांढरे पट्टे मारण्यात आले असले तरी ठिकठिकाणी गतिरोधकदेखील बसविण्याची गरज आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनीही सकाळी व सायंकाळच्या सत्रात श्री पद्माराजे विद्यालयाजवळील वन-वे जवळ थांबवून वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
फोटो - १७०२२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ येथील दत्त कारखाना ते पद्माराजे विद्यालयापर्यंतच्या मार्गावर पांढरे पट्टे मारण्यात आले.