श्वेतपत्रिका जाहीर करा म्हणणारे ‘के. पी.’ पहिले अध्यक्ष
By admin | Published: May 1, 2016 01:00 AM2016-05-01T01:00:35+5:302016-05-01T01:00:35+5:30
मुश्रीफ
कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी करणारे के. पी. पाटील हे देशातील पहिले अध्यक्ष असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. साखर आयुक्तांनी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली असली तरी जिल्हा बॅँकेशी संलग्न कारखान्यांना गॅप लोन देणार असल्याने त्यांची अडचण राहणार नसल्याचेही सांगितले.
जिल्हा बॅँकेशी सात कारखाने संलग्न आहेत. ‘भोगावती’ वगळता इतर कारखान्यांना गॅप लोन देण्यात कोणतीच अडचण नाही. ‘बिद्री’ कारखान्याला जिल्हा बॅँकेच्या मदतीची गरज नाही, स्वत:च्या हिमतीवर एफआरपी देऊ शकतात. इतकी आर्थिक परिस्थिती सक्षम आहे. कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी तर कारखान्याच्या गेल्या पाच वर्षांतील कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचे आवाहन प्रशासकांना केले आहे. स्वत:च्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा म्हणणारे के. पी. पाटील हे देशातील पहिले साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. शेतकरी संघटनेसह इतर नेत्यांच्या साखर साठे जप्त करण्याच्या घोषणांमुळे दर कोसळल्याचा आरोप आमदार मुश्रीफ यांनी केला.
विस्तारीकरणामुळेच ‘भोगावती’ अडचणीत
‘भोगावती’मध्ये मागील पाच वर्षांत खेळते भांडवलातून विस्तारीकरण केल्याने कारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली. पाच वर्षांत एफआरपी देत स्थिती सुधारण्याचा संचालकांनी प्रयत्न केला, पण सक्षमता आणता आली नसल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.