महादेवराव महाडिक विरोधात कोण...?

By admin | Published: November 5, 2014 12:17 AM2014-11-05T00:17:04+5:302014-11-05T00:22:06+5:30

मोर्चेबांधणी सुरू : विधान परिषदेचे पडघम

Who is against Mahadevrao Mahadik ...? | महादेवराव महाडिक विरोधात कोण...?

महादेवराव महाडिक विरोधात कोण...?

Next

विश्वास पाटील : कोल्हापूर :: विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात बरेच रामायण घडल्यानंतर आता पुढील वर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. गेली १७ वर्षे आमदार महादेवराव महाडिक हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. दोन वेळा अपक्ष व गेल्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर ते आमदार झाले. मुलगा अमल भाजपचे आमदार झाले, तरी महादेवराव महाडिक ‘मी अजून काँग्रेसचाच’ असे सांगत आहेत; परंतु काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यापासून त्यांना ताकद लावावी लागेल. आता तरी आमदार महाडिक यांच्यासमोर सतेज पाटील, पी. एन. पाटील, विनय कोरे व प्रा. जयंत पाटील यांची नावे विरोधी उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ३८३ मतदार आहेत.
विधान परिषदेच्या या जागेची मुदत डिसेंबर २०१५ पर्यंत आहे. तत्पूर्वी कोल्हापूर महापालिका व कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणुक होणार आहे. नगरपालिकांची मुदत २०१६ पर्यंत असल्याने तिथे फारसा परिणाम होणार नाही. गतवेळी आमदार महाडिक यांनी ही निवडणूक अखेरची असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे ते पुन्हा या निवडणूकीत शड्डू ठोकणार की एखाद्या कार्यकर्त्यास संधी देणार, यावरच लढतीतील चुरस अवलंबून असेल. उमेदवारीसाठी ते पुन्हा काँग्रेसच्या दारात जाण्याची शक्यता फारच कमी आहे. व्यक्तिगत राजकीय ताकद व अर्थकारण यांचा मेळ घालून महाडिक यांनी दोन वेळा ही निवडणूक जिंकली आहे. आता तर त्यांचा मुलगा भाजपचा आमदार झाल्याने त्यांचीही रसद त्यांना मिळू शकते.
महापालिका, जिल्हा परिषद व नगरपालिकांमध्ये सतेज पाटील यांचा दबदबा असला तरी मागल्या दाराने सत्तेत जाण्यास त्यांचा विरोध आहे. अमल महाडिक यांच्या विजयासाठी प्रा. जयंत पाटील यांनी बरीच मदत केली आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांच्याही उमेदवारीचा विचार होऊ शकतो. पी.एन.पाटील हे पक्षाशी एकनिष्ठ असल्याने ठरविले तर त्यांना ही उमेदवारी सहज मिळू शकते. परंतू या निवडणूकीतील संभाव्य घोडेबाजार व त्यांचे राष्ट्रवादीशी असलेले वैर यामुळे ते या मार्गाचा कितपत विचार करतात हे औत्सुकयाचे ठरेल. भाजप व महाडिक गटाचे उमेदवार म्हणूनही त्यांच्या उमेदवारीची शक्यता आहे.
महापालिका निकाल ठरविणार कोल्हापूर महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. १५ नोव्हेंबरला नवे सभागृह अस्तित्वात येईल. त्यामुळे या सभागृहात कुणाचे सदस्य किती असतील हे अत्यंत महत्त्वाचे असेल. आमदार महाडिक यांनी नुकतीच ताराराणी आघाडीची स्थापना करून महापालिकेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्याने तो पक्षही स्वबळावर लढणार हे निश्चित आहे. शिवसेनेला जिल्ह्यात चांगले बळ मिळाल्याने व शहरात शिवसेनेचा आमदार असल्याने त्यांचाही प्रयत्न चिन्हांवर लढण्याचा असेल. गेल्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये जागावाटपावरून आमदार महाडिक व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली. एकमेकांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यास विरोध झाला. त्यामुळे कार्यकर्ता काँग्रेसचा, परंतु त्यास राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेऊन रिंंगणात उतरविण्याचे राजकारण झाले. त्यात काँग्रेसचे नुकसान झाले. यावेळेसही असेच कुरघोडीचे राजकारण होणार आहे; परंतु महापालिकेत कुणाचे किती नगरसेवक यावरच बहुधा या लढतीचा निकाल ठरतो. ७७ पैकी आमदार महाडिक यांना ५० ते ५५ सदस्यांचे बळ दोन्हीवेळेला मिळाले. हे मताधिक्य अन्यत्र कुठे फेडता येत नसल्याने ही मते निर्णायक ठरत आली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या येत्या निवडणुकीत रणकंदन माजणार आहे.
राष्ट्रवादी काय करणार
विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या वाटा वेगळ््या झाल्याने राष्ट्रवादी काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरेल. जयसिंगपूर, कागल नगरपालिकांसह जिल्हा परिषद व महापालिकेतही या पक्षाचे निर्णायक संख्याबळ आहे. त्यामुळे ते कुणाला पाठिंबा देणार की स्वत:चा उमेदवार उभा करणार, ही उत्सुकता असेल.

Web Title: Who is against Mahadevrao Mahadik ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.