कोल्हापूरकरांवर आंदोलनांची वेळ आणली कुणी ? : राज्यकर्ते, प्रशासनच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 11:45 PM2018-06-06T23:45:16+5:302018-06-06T23:45:16+5:30
कोल्हापुरात कोणत्याही प्रश्नासाठी ऊठसूट आंदोलने केली जात असल्याची टीका गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केली; परंतु राज्यकर्ते व जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच जनतेला
कोल्हापूर : कोल्हापुरात कोणत्याही प्रश्नासाठी ऊठसूट आंदोलने केली जात असल्याची टीका गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केली; परंतु राज्यकर्ते व जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच जनतेला आंदोलने करावी लागत असून, लोकांवर आंदोलनाची वेळ आणली कुणी? अशी विचारणा होऊ लागली आहे.
दुधाचे मोजमाप इलेक्ट्रॉनिक काट्याऐवजी लिटर मापानेच करायचे असा शासनाने काढलेला आदेश व त्यावरून दूध संघापुढे उद्भवलेल्या अडचणी मांडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळासमोर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनांबाबतची नाराजी व्यक्त केली. अशीच नाराजी यापूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनीही एका पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केली होती. त्यानंतर शिवाजी पुलाच्या प्रश्नात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्वेगाने आंदोलकांना ‘मी तुम्हाला विमानाची बिझनेस क्लासची तिकिटे काढून देतो; पण तुम्ही दिल्लीला पुरातत्त्व विभागाच्या दारात जाऊन उपोषण करा,’ असे सुनावले होते; परंतु गंमत अशी की, त्याच पालकमंत्र्यांनी व खासदारांनी पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळताच ‘कोल्हापूरचा आणखी एक प्रश्न मार्गी लागला,’ म्हणून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. टोलचा प्रश्न, शिवाजी पुलास पर्यायी पुलाचे रखडलेले काम, अंबाबाई मंदिरातील पगारी पुजारी नियुक्ती, कोल्हापूर विकास प्राधिकरण, विमानसेवा, शाळा बंद आंदोलन ही गेल्या काही वर्षांतील यशस्वी आंदोलनाची उदाहरणे आहेत.
कोल्हापूर हा पूर्वापर विरोधकांचा जिल्हा राहिला आहे. या जिल्ह्यास आतापर्यंत कधीचएकमुखी नेतृत्व मिळालेले नाही. त्यामुळे या जिल्ह्याचा जो काही विकास झाला आहे, तो इथल्या लोकांनी स्वत:च्या हिमतीवर सरकारशी संघर्ष करून केला आहे. चांगल्याला चांगलं म्हणण्याचे आणि जिथे चुकते तिथे रस्त्यावर उतरण्याचे आणि विरोधात कितीही मोठा नेता अथवा व्यवस्था असो, त्यास विरोध करण्याचे धाडस इथल्या लाल मातीतल्या माणसाने कायमच दाखविले आहे. त्यामुळेच दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग नेतृत्वालाही कोल्हापूरने दत्तक विधान प्रकरणात वादग्रस्त विधान केल्यावर नमविले होते.
कोल्हापूर नुसते विरोधच करते असे नाही. अनेक चांगल्या गोष्टींना कोल्हापूरने कायमच पाठबळ दिले आहे. कोल्हापूरला चारित्र्यवान लोकांच्या आंदोलनाची उज्ज्वल परंपरा आहे. त्यामुळे चार-दोन फुटकळ आंदोलने कुणी केली व त्याचा तथाकथित त्रास जिल्हाधिकाºयांना झाला म्हणून त्यांनी या आंदोलनाच्या परंपरेची अवहेलना करू नये.
कोल्हापूरला सतत आंदोलने होतात म्हणून विकासाच्या प्रक्रियेत कोल्हापूर मागे राहिले असे वास्तव नाही. जे कोणी बोगस आंदोलन करतात, त्यांचा पर्दाफाश जरूर करावा किंवा समाजानेही अशा आंदोलनांना अजिबात ‘किंमत’ देऊ नये; परंतु, सरसकट आंदोलन म्हणजे चुकीचे किंवा कोल्हापूर म्हणजे बाद अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाऊ नये.
विचारांचा प्रभाव : अन्य शहरांमध्ये किंवा राज्यामध्ये लोक अन्याय झाला तर तो मुकाट्याने सहन करतात आणि कोल्हापूर तो सहन करीत नाही. हा इथल्या मातीचा, सामाजिक धाटणीचा, रुजलेल्या विचारांचा आणि पोसलेल्या लोकशाहीचा गुण आहे.