मुख्यमंत्री कोण ठाकरे की अजित पवार ? : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 03:02 PM2020-01-28T15:02:26+5:302020-01-28T15:07:01+5:30
सध्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंत्रीमंडळाच्या बैठकीत शांत दिसतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच सगळ्या घोषणा करत सुटलेत. याला उध्दवच एक दिवस कंटाळतील, कारण पवार हेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण ठाकरे की अजित पवार हेच कळत नसल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी लगावला.
कोल्हापूर : सध्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंत्रीमंडळाच्या बैठकीत शांत दिसतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच सगळ्या घोषणा करत सुटलेत. याला उध्दवच एक दिवस कंटाळतील, कारण पवार हेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण ठाकरे की अजित पवार हेच कळत नसल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी लगावला.
कोल्हापूर जिल्हा भाजपच्यावतीने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील निकष आणि अटींविरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते.
चोरून सत्तेवर आलेल्या या सरकारने दिलेला शब्द पाळलेला नाही. या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना काडीचाही फायदा होणार नाही. त्यामुळे चुकीचे निकष आणि जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.
पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर आणण्याणासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे. सरकारला जाग येत नसल्यानेच शाहू महाराजांच्या कोल्हापूरातून आम्ही हा आवाज उठवला आहे.
या योजनेमध्ये पीककर्जाचा उल्लेख केल्याने नियमित कर्ज भरणाऱ्या, बँका आणि पतसंस्थांचे कर्ज काढलेल्या, मायक्रो फायनान्सचे,भूविकासचे कर्ज काढलेल्या अशा कोणत्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत नाही. २0१९/२0 या वर्षातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश नाही. म्हणूनच आम्ही सरसकट कर्जमाफीचा आग्रह धरत आहोत.
मोर्चाचे संयोजक भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले, प्रामाणिक कर्ज भरणाऱ्यांनी गुन्हा केला असल्यासारखे त्यांना या योजनेतून वगळले आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या २५ हजार रूपये पगार असणाऱ्या मुलांना या योजनेचा फायदा नाही.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक,सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांची यावेळी भाषणे झाली. यावेळी माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, अमल महाडिक, हिंदूराव शेळके,महेश जाधव, राहूल चिकोडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.