आम्हाला जागा देणारे ‘दादा’ कोण?

By admin | Published: January 26, 2017 12:35 AM2017-01-26T00:35:25+5:302017-01-26T00:35:25+5:30

शिवसेनेकडून विचारणा : जिल्हा परिषदेत सेनाच मोठा पक्ष ठरेल : दुधवडकर-सुपर व्होट

Who is the 'Dada' who gives us space? | आम्हाला जागा देणारे ‘दादा’ कोण?

आम्हाला जागा देणारे ‘दादा’ कोण?

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला गृहीत धरून जागा देण्याची भाषा बोलणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आम्हाला जागा देण्याचा अधिकार कुणी दिला, अशी थेट विचारणा करीत समविचारी पक्षांसोबतचा सन्मानजनक प्रस्ताव भाजपने दिल्यास त्यावर विचार करू, असे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रवादी व काँग्रेसशी युती होणार नाही, असे सांगून निवडणुकीत शिवसेनाच सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कळंबा रोडवरील अमृतसिद्धी हॉल येथे शिवसेनेच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यांतील इच्छुकांच्या मुलाखतीवेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुधवडकर म्हणाले, शिवसेनेचा मुंबईपाठोपाठ कोल्हापूर हा बालेकिल्ला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागांसाठी तब्बल ८२७ इच्छुक पक्षाकडे असून, त्यांच्या मुलाखती सुरू आहेत. भाजपसोबत युतीबाबत आज, गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भूमिका जाहीर करतील. कोल्हापुरातही सन्मानजनक प्रस्ताव न आल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी आहे.

कोल्हापूरची भाजप कोण चालवितो?
राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असणारे चंद्रकांतदादा पाटील हे जर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या घरात जाऊन बसत असतील तर कोल्हापूरची भाजप कोण चालवितो? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ‘दादां’नी महाडिकांच्या घरी जायचे की महाडिकांनी ‘दादां’च्या घरी यायचे, अशी कोपरखळी दुधवडकर यांनी हाणली.


दादांना विकासाचे देणे-घेणे नाही
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना जिल्ह्याच्या विकासाचे काहीच देणे-घेणे नसून ते फक्त भाजपमध्ये कोणाला घ्यायचे यामध्येच अडकले असल्याचा चिमटा दुधवडकर यांनी काढला.
सत्तापिपासू भाजपमध्ये.. : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये होत असलेल्या ‘इनकमिंग’वर दुधवडकर यांनी मार्मिक टिप्पणी करीत हे चित्र सन १९९५ मध्येही होते. फरक एवढाच होता की त्यावेळी हे लोक शिवसेनेत येत होते, तर आता भाजपमध्ये जात आहेत. सत्ता डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेश करणाऱ्या या सत्तापिपासू कावळ्यांचा अनुभव नंतर दादांना येईलच, असा टोला लगावला.

 

Web Title: Who is the 'Dada' who gives us space?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.