प्रचारसभेत दगडफेक: घटनेमागे नेमकं कोण उघड करावे, चित्रा वाघ यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 04:56 PM2022-04-04T16:56:45+5:302022-04-04T17:12:04+5:30
पोटनिवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी कायदा-सुव्यवस्थेला कोठेही गालबोट लावू दिले नाही. सभेत दगडफेक करून दहशत निर्माण करण्याची घटना गंभीर
कोल्हापूर : भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या मुक्त सैनिक वसाहतमधील प्रचार सभेत दगडफेक करणाऱ्या संशयितांचा शोध घ्यावा, गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडलेली घटना चिंता व्यक्त करणारी आहे, त्यामुळे या घटनेमागे कोणाचा सहभाग आहे हे उघड करावे, अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली आहे.
रविवारी रात्री मुक्त सैनिक वसाहत परिसरात भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेवेळी व्यासपीठाच्या मागील बाजूस अनोळखी दोघांनी दगडफेक केली. याबाबत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करीत पोलीस अधीक्षक बलकवडे यांची भेट घेऊन चर्चा केली.
त्या म्हणाल्या, पोटनिवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी कायदा-सुव्यवस्थेला कोठेही गालबोट लावू दिले नाही. सभेत दगडफेक करून दहशत निर्माण करण्याची घटना गंभीर आहे. घटनेमागे नेमके कोण आहे याचा उलगडा होणे गरजेचे आहे, त्यासाठी भाजपा महिला आघाडीचा आग्रह राहणार आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी घटनेबाबत संबंधितांचा छडा लावण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे चित्रा वाघ यांना सांगितले.