गांधीनगर पाणी योजनेचे श्रेय घेणारे क्षीरसागर कोण..? आमदार ऋतुराज पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 02:13 PM2022-01-27T14:13:18+5:302022-01-27T14:13:48+5:30

या योजनेला निधी मंजूर झाल्याची माहिती देऊन त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राजेश क्षीरसागर करत आहेत.

Who is Kshirsagar taking credit for Gandhinagar Water Scheme, Question by MLA Rituraj Patil | गांधीनगर पाणी योजनेचे श्रेय घेणारे क्षीरसागर कोण..? आमदार ऋतुराज पाटील यांचा सवाल

गांधीनगर पाणी योजनेचे श्रेय घेणारे क्षीरसागर कोण..? आमदार ऋतुराज पाटील यांचा सवाल

Next

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गांधीनगरसह वीस गावांसाठीच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट केलेल्या सर्व गावांतील लोकांशी चर्चा करूनच या योजनेबाबत निर्णय घेणे संयुक्तिक ठरणार आहे. या योजनेला अद्याप कोणतीही प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही; पण या योजनेला निधी मंजूर झाल्याची माहिती देऊन त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राजेश क्षीरसागर करत आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील या पाणीयोजनेचे श्रेय घेणारे क्षीरसागर कोण ? त्यांचा या योजनेशी काय संबंध ? अशी विचारणा आमदार ऋतुराज पाटील यांनी मंगळवारी केली.

क्षीरसागर यांनी आपल्या पाठपुराव्यामुळे १३७ कोटींची ही योजना मंजूर होऊन त्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे माध्यमांना सांगितले आहे. वास्तविक या योजनेत समाविष्ट सर्व २० गावांनी अद्याप याबाबत मान्यता दिलेली नाही. मग ती योजना मंजूर कशी होईल? त्याला निधी कसा उपलब्ध होईल? तसेच मी प्रतिनिधित्व करणाऱ्या दक्षिण मतदारसंघातील पाणी योजनेला निधी मंजुरीची जाहीर घोषणा करण्याची घाई क्षीरसागर यांना का झाली आहे? असा सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार पाटील म्हणतात, राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेतून कोल्हापूर दक्षिण मतदासंघातील गांधीनगरसह उचगाव, पाचगाव, मुडशिंगी, वळीवडे, वसगडे, सरनोबतवाडी, नेर्ली, तामगाव उजळाईवाडी, आदी २० गावांसाठी सुधारित पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील तसेच मी स्वतः पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. डिसेंबर महिन्यात या योजनेला तांत्रिक मान्यता मिळाली; पण योजनेत समाविष्ट वीस गावांपैकी नेर्ली, तामगाव, कणेरीवाडी, सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे, चिंचवाड, वसगडे या आठ गावांतील लोकांनी या योजनेत समाविष्ट होण्यास नकार दिला आहे.

या योजनेची पाणीपट्टी आम्हाला परवडणार नाही. योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी वार्षिक सात कोटी खर्च येणार आहे, असे या गावातील लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व २० गावांतील लोकांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊन पुढील पाऊल टाकणे अपेक्षित आहे. ही चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात पालकमंत्री सतेज पाटील व मी या सर्व गावांतील लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांची बैठक घेण्याचे नियोजन केले आहे.

श्रेयवाद थांबवावा

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष समाविष्ट आहेत, याची क्षीरसागर यांनी जाणीव ठेवावी. त्यामुळे श्रेयवादाचे राजकारण त्यांनी थांबवावे, असेही आमदार पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे

Web Title: Who is Kshirsagar taking credit for Gandhinagar Water Scheme, Question by MLA Rituraj Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.