संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शाहिरीतून जिवंत ठेवणारे द. ना. गव्हाणकर जनतेचे शाहीर - डॉ. पाटणकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 04:39 PM2024-06-08T16:39:05+5:302024-06-08T16:40:02+5:30
लोक संघर्ष मोर्चाच्या लढाऊ नेत्या प्रतिभा शिंदे यांना लोकशाहीर द.ना.गव्हाणकर स्मृती पुरस्कार प्रदान
आजरा : संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आपल्या शाहिरीतून द. ना. गव्हाणकर यांनी कायमपणे जिवंत ठेवली. त्यामुळेच ते जनतेचे शाहीर होते असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील लोक संघर्ष मोर्चाच्या लढाऊ नेत्या प्रतिभा शिंदे यांना लोकशाहीर द.ना.गव्हाणकर स्मृती पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयवंत शिंपी होते.
पुरस्कारापाठीमागील भूमिका मुकुंद देसाई तर प्रास्ताविक कॉ. संपत देसाई यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाहीर द.ना. गव्हाणकर व विद्रोही साहित्यिक राजा शिरगुप्पे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. प्रतिभा शिंदे यांचा शाल, श्रीफळ, रोख १० हजार, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजात आपल्या हक्कासाठी लढण्याची जिद्द व ताकद प्रचंड आहे. मात्र त्यांच्यात भूक, भिती व भ्रम निर्माण करून त्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे. त्यासाठी संसदीय पद्धतीत काम करणाऱ्यांचे डोकं ठिकाणावर आणले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन पुरस्काराला उत्तर देताना प्रतिभा शिंदे यांनी केले. पूर्वी लोकांमध्ये जनजागृतीसाठी शाहिरी कला होती मग आता ही शाहिरी कला गेली कुठे ? असा सवाल करून यापुढील काळात शाहीर घडविणारी कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन केले पाहिजे असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले.
कार्यक्रमास किसन कुराडे, स्वाती कोरे, सुधीर देसाई, अल्बर्ट डिसोझा, शिवाजी बोलके, रावसाहेब देसाई, राजू होलम, बंडोपंत चव्हाण, डॉ.कृष्णा मेणसे, प्राचार्य जे. बी.पाटील, अमर चव्हाण, विद्याधर गुरबे, एम.के. देसाई, रणजीत देसाई, अनिकेत चराटी, संग्राम सावंत, संजीवनी सावंत, नितीन पाटील, सुनिल पाटील यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सौ. सुतार तर आभार संजय घाटगे यांनी मानले.
सामाजिक चळवळीतील शेवटचा पुरस्कार
आदिवासींच्या अन्यायाविरोधात लढा देत सामाजिक चळवळीत काम करीत आहे. त्यामुळेच द.ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार आज देण्यात आला. आता काँग्रेस पक्षात मी प्रवेश केलेला असल्याने सामाजिक चळवळीतील हा शेवटचाच पुरस्कार असल्याचे प्रतिभा शिंदे यांनी सांगताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.