महापौर कोण? उत्कंठा शिगेला
By admin | Published: November 10, 2015 12:32 AM2015-11-10T00:32:09+5:302015-11-10T00:34:46+5:30
कॉँग्रेसकडे ४४, तर भाजपकडे शिवसेना गृहीत धरून ३७ नगरसेवक
कोल्हापूर : महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सध्या कॉँग्रेसकडे राष्ट्रवादीचे १५ व २ अपक्षांसह ४४ असे बहुमत मिळविणारे संख्याबळ आहे, तर भाजप-ताराराणी आघाडीकडे शिवसेनेचे चार गृहीत धरून व १ अपक्षासह ३७ नगरसेवक आहेत. त्यांना सत्तेसाठी आणखी चार नगरसेवकांची आवश्यकता आहे. तरीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर ‘भाजप’चाच होईल, असे वारंवार सांगितल्यामुळे चुरस निर्माण झाली असून विशेषत: कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मोठी आमिषे दाखविली गेल्याची चर्चा आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीसह कॉँग्रेसच्या नेत्यांनीही नगरसेवकांना पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या नगरसेवकांशी कोण भेटतोय, यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडे अपेक्षित संख्याबळ असतानाही भाजपचा महापौर करण्यासाठी भाजप-ताराराणीने महापौरपदाचे गणित जुळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सरूकेले आहेत. सभागृहात हात वर करून उघडपणे मतदान करायचे आहे. म्हणूनच ताराराणीचे कारभारी हे गणित कसे जमवायचे, पर्याय काय ठेवायचे, याच्यावर विचारविनिमय करीत आहेत.
महापौरपदाचे उमेदवार
कॉँग्रेस : आश्विनी रामाणे, दीपा मगदूम, स्वाती यवलुजे, उमा बनछोडे.
भाजप : मनीषा कुंभार, गीता गुरव, सविता भालकर.
उपमहापौरपदाचे उमेदवार
राष्ट्रवादी कॉँग्रेस : शम्मा मुल्ला, सूरमंजिरी लाटकर, वहिदा सौदागर.
ताराराणी आघाडी : किरण शिराळे, ईश्वर परमार.
कॉँग्रेस,राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या मुलाखती
कोल्हापूर : महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सायंकाळी कॉँग्रेस व राष्ट्रवादीमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. कॉँग्रेसकडून महापौरपदासाठी चार नगरसेविका, तर राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी तीन नगरसेविकांनी आपल्या नावाचा आग्रह धरला आहे. आज, मंगळवारी दुपारी त्या त्या पक्षाचे नेते कोणाला महापौर व उपमहापौर करायचे हे ठरविणार आहेत. त्यामुळे या पदांचे दावेदार कोण असतील, याची उत्कंठा वाढली आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजता स्टेशन रोडवरील कॉँग्रेस कार्यालयात जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी मंत्री सतेज पाटील यांनी पक्षातील चार इच्छुक नगरसेविकांच्या मुलाखती घेतल्या.त्यानंतर कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांना सतेज पाटील व पी. एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उपमहापौरपदासाठीच्या उमेदवारांच्या मुलाखती सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विश्रामगृहावर माजी मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, के. पी. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडल्या. उपमहापौरपदासाठी पक्षाकडून चौघे इच्छुक असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले; परंतु त्यांची नावे सांगण्यास नकार दिला.