कुणी जागा देता का जागा ?

By Admin | Published: November 21, 2014 09:24 PM2014-11-21T21:24:07+5:302014-11-22T00:17:45+5:30

जागांचे भाव गगनाला : आजरा शहरातील व्यावसायिकांची अवस्था

Who places the space? | कुणी जागा देता का जागा ?

कुणी जागा देता का जागा ?

googlenewsNext

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -शहरातील मर्यादित बाजारपेठेमुळे बाजारपेठेतील रिकाम्या जागांसह व्यवसाययोग्य जागांचे भाव गगनाला भिडले असून अनेक व्यावसायिकांना जागा शोधत भटकावे लागत आहे. कुणी जागा देता का जागा ? असे म्हणण्याची वेळ दुकानदार व व्यावसायिकांवर आली आहे.
गेल्या दहा ते पंधरा वर्षांत आजरा शहराचा विस्तार प्रचंड वाढला आहे. शहर चारही बाजूंना उपनगरांच्या माध्यमातून विस्तारत गेले आहे. एकीकडे शहराचा विस्तार होत असताना मुख्य बाजारपेठ संभाजी चौक ते आजरा अर्बन बँक एवढीच मर्यादित राहिली आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण व्यवसायाकडे वळत असल्याने व्यवसाय उभे करण्याची इच्छा आहे; परंतु व्यवसायासाठी जागाच नाही, अशी परिस्थिती या तरुणवर्गाची आहे.
मूळ जागामालकांना व्यावसायिक जागांच्या टंचाईची कल्पना आल्याने व्यवसाययोग्य तयार इमारतींच्या भाड्यामध्ये प्रचंड वाढ सांगितली जात आहे. इमारत भाडे, अनामत रक्कम, नोकर पगार व व्यवसायातील गुंतवणुकीवरील व्याज याचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक व्यावसायिक व्यवसाय बंद ठेवण्याला प्राधान्य देत आहेत.
ग्रामपंचायत मालकीच्या गाळ्याच्या भाडेकरूंनी पोटभाडेकरू ठेवून नाममात्र भाड्यावर मिळालेले दुकानगाळे स्वकमाईचे साधन बनवून टाकले आहेत.
ग्रामपंचायत मालकीच्या ठिकठिकाणच्या खोक्यांची अवस्था फारशी वेगळी नाही. या सर्व प्रकारामुळे छोटे भांडवल गुंतवून व्यवसाय करू इच्छिणारे नवोदित व्यावसायिक अडचणीत येत आहेत. व्यवसायासाठी कुणी जागा देता का जाग ? असे म्हणण्याची वेळ आली आहे.


मुख्य बाजारपेठेत जागांचे विक्री दर सात हजार ते दहा हजार रूपये प्रती चौरस फुटापर्यंत गेले आहेत, तर तयार गाळे ३० ते ५० रूपये प्रती चौरस फूट भाड्याने दिले जात आहेत.
एकीकडे व्यापारी, व्यावसायिक जागांच्या शोधात असताना दुसरीकडे स्थिरस्थावर असणाऱ्या सहकारी संस्थांही जागांच्या शोधात असल्याने बाजारपेठेतील जागांचे दर गगनाला भिडले आहेत.

Web Title: Who places the space?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.