गडहिंग्लजमध्ये ‘जनसुराज्य’ची ‘शक्ती’ कोणाला?
By admin | Published: March 4, 2016 01:08 AM2016-03-04T01:08:30+5:302016-03-04T01:09:11+5:30
कारखाना निवडणूक : हॅट्ट्रिक करणार की ‘आऊट’ होणार याकडे लक्ष
राम मगदूम - गडहिंग्लज गेल्या दहा वर्षांपासून गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सत्तेतील भागीदार असणारा ‘जनसुराज्य’ यावेळी विजयाची हॅट्ट्रिक करणार की गडहिंग्लजच्या राजकीय पटलावरून ‘आऊट’ होणार हे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्या भूमिकेवरच अवलंबून आहे. त्यामुळेच ते यावेळी ‘जनसुराज्य’तर्फे लढणार की, राष्ट्रवादीतून रिंगणात उतरणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
२००४ मध्ये तत्कालीन मंत्री बाबासाहेब कुपेकरांच्या विरोधात चव्हाणांनी बंड केले. त्यावेळी ‘जनसुराज्य’चे नेते विनय कोरे यांनीच त्यांना ‘ताकद’ दिली. त्यामुळे पहिल्यांदाच लढूनही त्यांना विधानसभेला दुसऱ्या क्रमांकाची २५ हजार मते मिळाली होती. त्यानंतर कोरेंनी अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्याशी ‘युती’ करून साखर कारखाना, पालिकेच्या सत्तेत ‘जनस्वराज्य’ला भागीदारी मिळवून दिली.
दरम्यान, शिंदे व चव्हाण यांच्यातील अंतर्गत कुरघोडींमुळे नगरपालिकेची सत्ता गेली. त्यानंतर आर्थिक अरिष्टातील कारखाना चालविण्यावरून मतभेद झाल्यामुळे अविश्वास नाट्यातून शिंदेंना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. उपाध्यक्ष म्हणून कारखान्याची सूत्रे त्यांच्याकडेच राहिली आणि शिंदेंनी गेलेली सत्ता राष्ट्रवादीकडून पुन्हा हस्तगत केली.
दरम्यान, गडहिंग्लज कारखाना ‘ब्रीस्क’ कंपनीला चालवायला देताना मुश्रीफांनी चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांना भविष्यातील राजकीय वाटचालीत सोबत घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, स्थानिक परिस्थितीमुळे काही संचालकांनी विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ आणि संध्यादेवी कुपेकरांच्या विरुद्ध प्रचार केला. त्यामुळेच विरोधात गेलेल्या ‘त्या’ संचालकांच्या उमेदवारीस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा तीव्र आक्षेप आहे. या पार्श्वभूमीवरच चव्हाण समर्थकांनी आपली उमेदवारी स्वतंत्रपणे दाखल केली आहे.
‘ब्रीस्क’कडे कारखाना देण्यापासून चव्हाणांची वाटचाल मुश्रीफांच्या मार्गदर्शनाखालीच सुरू आहे. त्यामुळेच या निवडणुकीतही सत्ताधारी पॅनेलचे नेतृत्वही त्यांच्याकडेच राहील. सत्ताधारी पॅनेलमध्ये चव्हाण समर्थकांचा समावेश ‘जनसुराज्य’ म्हणून होणार की, त्यांना राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लढावे लागणार, हे स्पष्ट होण्यासाठी माघारीपर्यंत वाट पाहावी लागेल.
विनय कोरे, प्रकाश चव्हाण यांच्या भूमिकेकडे लक्ष
गेल्या दहा वर्षांपासून गडहिंग्लज कारखान्यासह नगरपालिकेच्या सत्तेत प्रकाश चव्हाण यांनी बदलत्या परिस्थितीनुसार राजकीय भूमिका घेतली आहे. तरीही त्यांनी ‘जनसुराज्य’ला सोडचिठ्ठी दिलेली नाही. त्यामुळेच ते यावेळीही ‘जनसुराज्य’तर्फेच रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. कदाचित त्यांनी ‘जनसुराज्य’ला सोडल्यास विनय कोरे यांची भूमिका काय राहणार? ते कुणाला ‘शक्ती’ देणार? याचीही चर्चा सुरू आहे.
ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत गेल्या १०-१२ वर्षांतील सर्व निवडणुका आपण ‘जनसुराज्य’तर्फे च लढविल्या आहेत. ‘जनसुराज्य’चे संचालक म्हणून १० वर्षे कारखान्याच्या सत्तेत आहोत. आम्ही अजूनही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे ही निवडणूकदेखील ‘जनसुराज्य’तर्फेच लढविणार आहोत.
- प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष - गडहिंग्लज कारखाना.