सत्ताधारी कोण? आज फैसला
By admin | Published: April 26, 2016 12:33 AM2016-04-26T00:33:16+5:302016-04-26T00:37:33+5:30
चित्रपट महामंडळ निवडणूक : निवेदिता सराफ, पाटकर यांच्यासह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर कोण सत्ताधारी होणार हे आज, मंगळवारी समजणार आहे. महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीतील मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून राम गणेश गडकरी सभागृहात होणार आहे. यासाठी चौदा टेबलांवर मतमोजणीचे नियोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीत अभिनेता विजय पाटकर, निवेदिता सराफ, वर्षा उसगावकर, सुशांत शेलार, गजेंद्र अहिरे, आदी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
महामंडळाच्या १४ जागांसाठी क्रियाशील पॅनेल, शक्ती, समर्थ, कोंडके, फाळके, शाहू, संघर्ष, माय मराठी आणि परिवर्तन अशा नऊ पॅनेल आणि अपक्षांसह १२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्यासाठी रविवारी (दि. २४) दोन हजार १३५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ५४.६४ टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा मुंबई आणि पुण्यातील मतपेट्या कोल्हापुरातील महामंडळाच्या कार्यालयात आणण्यात आल्या. याठिकाणी त्या कडक सुरक्षेत ठेवण्यात आल्या. मतमोजणी प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास मतपेट्या मतमोजणीच्या ठिकाणी नेण्यात येतील. (प्रतिनिधी)
मतमोजणीची प्रक्रिया अशी :
मतमोजणीसाठी यात १४ गटांसाठी चौदा टेबल असणार आहेत. पॅनेलनिहाय तसेच अपक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतमोजणीसाठी प्रवेश देण्यात येईल. सायंकाळी सहापर्यंत निकाल जाहीर करण्याच्यादृष्टीने मतमोजणी प्रक्रियेची तयारी केली आहे.
दिग्गज, अपक्ष उमेदवार
विविध पॅनेलच्या माध्यमातून अभिनेता विजय पाटकर, सुशांत शेलार, मिलिंद गवळी, आनंद काळे, अभिनेत्री निवेदिता सराफ, वर्षा उसगांवकर, दीपाली सय्यद, पूजा पवार, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, दिग्दर्शिका अॅड. समृद्धी पोरे यांनी तर, दिग्दर्शक महेश मांजरेकर, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, मनोज मराठे, सूर्यकांत तिवडे, नारायण सूर्यवंशी, रामदास परसैय्या, कृष्णाजी राजे, राजेंद्र कदम, शरद लोणकर, सूरजमल गुंदेशा आदींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.