Kolhapur: रुग्णांना गर्भलिंग निदानासाठी पाठवणारा डॉ. युवराज निकम गजाआड
By उद्धव गोडसे | Updated: February 14, 2024 15:30 IST2024-02-14T15:30:05+5:302024-02-14T15:30:34+5:30
कोकणातून रुग्ण पाठवले, औषध पुरवठादारांचा शोध सुरू

Kolhapur: रुग्णांना गर्भलिंग निदानासाठी पाठवणारा डॉ. युवराज निकम गजाआड
कोल्हापूर : क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील सुलोचना पार्कमध्ये घरात थाटलेल्या अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्राकडे रुग्णांना पाठवणा-या डॉक्टरला वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) येथून करवीर पोलिसांनी अटक केली. युवराज विलास निकम (वय ३४, सध्या रा. वैभववाडी, मूळ रा. म्हालसवडे, ता. करवीर) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे. या गुन्ह्यात अटक झालेला हा सातवा संशयित आरोपी आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.
मुलगा होण्याचे औषध देण्याची जाहिरात सोशल मीडियात करून अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणा-या रॅकेटचा भांडाफोड १६ जानेवारीला झाला होता. आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर करवीर पोलिस रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचत आहेत. बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील (रा. बालिंगा, ता. करवीर) याच्यासह सहा जणांना अटक झाली होती.
यातील सातवा संशयित डॉ. युवराज निकम याला पोलिसांनी मंगळवारी (दि. १३) रात्री वैभववाडी येथील त्याच्या दवाखान्यातून अटक केली. त्याने कोकणातील काही रुग्णांना गर्भलिंग तपासणीसाठी सुलोचना पार्क येथे पाठवले होते. एजंट म्हणून काम करताना त्याला प्रत्येक रुग्णामागे १० ते २० हजार रुपये मिळाले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. गर्भपाताची औषधे पुरवणारी एक महिला मेडिकल चालक पोलिसांच्या रडारवर आहे. तिलाही लवकरच अटक होईल, अशी माहिती निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.