नेसरी-गिजवणेत विकास आघाडीचा पाठिंबा कुणाला ?
By admin | Published: February 20, 2017 12:23 AM2017-02-20T00:23:45+5:302017-02-20T00:23:45+5:30
गडहिंंग्लजचे राजकारण : शिंदे-गड्यान्नावर यांच्या निर्णयाकडे लक्ष
राम मगदूम ल्ल गडहिंग्लज
राष्ट्रवादीच्या विरोधात दंड थोपटलेल्या गडहिंग्लज तालुका विकास आघाडीचे प्रमुख जनता दलाचे ज्येष्ठ नेते व गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे व स्वाभिमानी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर हे राष्ट्रवादीच्यादृष्टीने प्रतिष्ठेचे असणाऱ्या गिजवणे व नेसरी गटात आघाडीचा पाठिंबा कुणाला देतात, याकडेच गडहिंग्लजसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कागल मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या गिजवणे गटात गडहिंग्लज कारखान्याचे संचालक सतीश पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. ते विद्यमान जि. प.सदस्या शैलजा पाटील यांचे पती व आमदार हसन मुश्रीफ यांचे निकटचे सहकारी आहेत. त्यामुळेच ही जागा टिकविण्यासाठी मुश्रीफ यांनी शक्ती पणाला लावली आहे.
राष्ट्रवादीचे पाटील यांच्याविरुद्ध भाजपाने संजय बटकडली यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासाठी भाजपचे नेते व कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रकाश शहापूरकरांनी ताकद लावली आहे. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर काँगे्रसच्या तिकिटावर लढणाऱ्या दिग्विजय कुराडे यांच्यासाठी त्यांचे पिताश्री किसनराव कुराडे, चुलते सुरेश कुराडे व अनिल कुराडे यांनी ताकद लावली आहे.
स्व. कुपेकरांचा बालेकिल्ला म्हणून जिल्हाभर ख्याती असणाऱ्या नेसरी गटात राष्ट्रवादीने विद्यमान सदस्या मीनाताई जाधव यांचे पती माजी सभापती दीपकराव जाधव यांनाच चाल दिली आहे. अजातशत्रू म्हणून परिचित असलेले जाधवदेखील गडहिंग्लज कारखान्याचे संचालक आहेत. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर व भाजपाचे हेमंत कोलेकर यांनी दंड थोपटले आहे.
तथापि, गडहिंग्लज तालुक्यातील नूल, हलकर्णी व भडगाव गटातील जागा ताकदीने लढणाऱ्या जनता दल, स्वाभिमानी, हत्तरकी व पताडे गट युतीच्या आघाडीने गिजवणे व नेसरी गटात जि.प.साठी उमेदवार उभे न करता ‘हातचा’ राखून ठेवला आहे.
हत्तरकी, पताडेंसाठी शिवसेनेची माघार !
हत्तरकी गटात रेखाताई राजकुमार हत्तरकी यांच्यासाठी, तर भडगाव गटात जोत्स्ना प्रकाश पताडे यांच्यासाठी, तर महागाव गणात जनता दलाचे बाळकृष्ण परीट यांच्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता राष्ट्रवादीच्या विरोधकांनाच आघाडी पाठिंबा देईल, असे दिसते. हा निर्णय शेवटच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.