‘मोरांवर चोर’ कोण हे गुलदस्त्यातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:07 AM2017-07-21T00:07:00+5:302017-07-21T00:07:00+5:30
वनखात्याचा डोळेझाक कारभार : मोरांचे अवशेष मिळूनही तक्रार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : कंदलगाव येथील मोर चोरी प्रकरण घडून दहा दिवस उलटले तरीही वनखात्याकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे. कंदलगावच्या माळावर दोन मोरांचे अवशेष मिळूनही वनखात्याकडून कोणतीही तक्रार दाखल न झाल्यामुळे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती करवीर पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रकारामुळे वनखात्याचा डोळेझाक कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कंदलगाव (ता. करवीर) येथील करमाळा मळ्यात दि. ९ जुलै रोजी सायंकाळी पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून सात ते आठजणांनी जाळी लावून आठ ते नऊ मोर पकडून गाडीत घालून नेले. नागरिकांनी मोटारीच्या क्रमांकासह सर्व माहिती त्वरित पोलिसांना कळविली. पोलिसांनी संबंधित गाडी ताब्यात घेतली. मात्र, आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दुसऱ्या दिवशी कंदलगावातीलच खड्याच्या माळावर बाभळीच्या झुडपात काही शेतकऱ्यांना मोरांची पिसे दिसली; पण त्यानंतर वनखाते आणि पोलीस यंत्रणेची हतबलता दिसून आली. मोर हा राष्ट्रीय पक्षी असूनही हे चोरीचे प्रकरण दोन्हीही विभागांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे उघड झाले आहे.
शुक्रवारी (दि. १४) पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी, मोरांच्या चोरीबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले; पण नंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करू, असे आश्वासन दिले.
राजकीय दबावाची कंदलगावात चर्चा
मोर या राष्ट्रीय पक्ष्याच्या तस्करीसाठी जिल्ह्यात मोरांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, पोलीस खात्याने याबाबत पंचनामा करून अहवाल वनखात्याकडे पाठविला; पण याकडेही वनविभागाने डोळेझाक करण्याचीच भूमिका बजावली. राजकीय दबावापोटी वनखात्यातर्फे या प्रकरणी तोंडावर बोट ठेवून, ‘असे घडलेच नसल्या’ची भूमिका घेतली असल्याची कंदलगाव परिसरातील नागरिकांत चर्चा सुरू आहे.
कंदलगाव येथील माळावरून मोरांच्या चोरीप्रकरणी पोलीस खात्याने सखोल चौकशी करून त्याचा वनविभागाकडे अहवाल पाठविला आहे; पण वन विभागाकडून तक्रार देण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याने पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
- सूरज गुरव, उपअधीक्षक,
करवीर विभाग.
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कंदलगाव माळावर मोराचे काही अवशेष मिळाले आहेत. पोलीस खात्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला आहे. चौकशीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. या प्रकरणाचा सखोेलपणे तपास करून आरोपींचा छडा लावू.
- प्रभुनाथ शुक्ल,
उपवनसंरक्षक