तंबी देणारे चंद्रकांत पाटील कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:20 AM2018-07-09T00:20:44+5:302018-07-09T00:20:51+5:30
कोल्हापूर : ऊस व दूध आंदोलनात आतापर्यंत चार मुख्यमंत्र्यांशी संघर्ष केला, त्यात आम्हाला तंबी देणारे चंद्रकांत पाटील कोण? अशा धमक्यांना ‘स्वाभिमानी’चे मावळे घाबरत नाहीत, असा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मुंबई पाकिस्तानात नाही, तर मग पाकिस्तानची साखर मुंबईत आली कशी, त्यावेळी मंत्री पाटील काय करत होते? असा सवालही त्यांनी केला.
दूध पुरवठा रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे काय? कायदा हातात घेतला तर कारवाई करू, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पन्हाळगडावर दिला होता. याबाबत बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले, तंबी देऊन शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याची भाषा मंत्री चंद्रकांत पाटील करत आहेत; पण आतापर्यंत चार मुख्यमंत्र्यांशी आम्ही संघर्ष केला आहे, त्यात चंद्रकांत पाटील हे कोण? त्यांच्या अशा धमक्यांना ‘स्वाभिमानी’चे मावळे घाबरत नाहीत.
मुंबई पाकिस्तानात आहे की आणखी कोठे हे मंत्री पाटील यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांना विचारावे.
पाकिस्तानात मुंबई नाहीतर मग तेथील साखर येते कशी? त्यावेळी तुम्ही काय करत होता. आमचे दूध विकायचे की नाही, हे आम्ही ठरवतो; त्यामुळे कोणी जबरदस्ती करू नये, असेही शेट्टी यांनी सांगितले.
कोरे म्हणजे सरकार नव्हे
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सभागृहाबाहेर कोणतीही घोषणा करता येत नाही. सदाभाऊ खोत दुग्धविकास मंत्री आहेत काय ? आणि अधिकार पदावर नसणारे विनय कोरे अनुदानाची घोषणा करायला ते सरकार आहेत काय ? त्यामुळे दूध व पावडर निर्यात अनुदानाची घोषणा झाली नसल्याचे शेट्टी यांनी सांगिंतले.
शेतकºयांच्या खात्यावरील अनुदानाच्या मागणीवर ठाम
सरकारचा दूध निर्यात अनुदान देण्याचा प्रयत्न आहे; पण आम्हाला हे मान्य नाही. दूध पावडर पोटी ५३ कोटींचे अनुदान दिले, त्याचा काय फायदा झाला, उलट दोन रुपयांनी दुधाचे दर कमीच झाले; त्यामुळे निर्यात अनुदानापेक्षा शेतकºयांच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदानावर आम्ही ठाम असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.