देशासाठी कुणी मरायला सांगितलं होतं? शहीद ऋषिकेश जोंधळेंच्या कुटुंबीयांना ग्रामसेवकाचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 07:27 PM2022-06-09T19:27:13+5:302022-06-09T19:31:37+5:30

जोंधळे-डवरी वाद चव्हाट्यावर.

Who was told to die for the country? Trouble of Gram Sevak to the family of martyr Rishikesh Jondhale | देशासाठी कुणी मरायला सांगितलं होतं? शहीद ऋषिकेश जोंधळेंच्या कुटुंबीयांना ग्रामसेवकाचा त्रास

देशासाठी कुणी मरायला सांगितलं होतं? शहीद ऋषिकेश जोंधळेंच्या कुटुंबीयांना ग्रामसेवकाचा त्रास

googlenewsNext

आजरा : वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील सुपुत्र ऋषिकेश जोंधळे देशाच्या सीमेवर शहीद झाले. त्यांच्याच आई-वडिलांना गावातील ग्रामसेवकाने अपमानास्पद शब्द वापरल्याची संतापजनक घटना समोर आली. तुझ्या मुलाला देशासाठी कोणी मरायला सांगितले होते असे अपमानास्पद शब्द ग्रामसेवक राजेंद्र उर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी याने वापरले.

ग्रामसेवक राजेंद्र उर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी याने जोंधळे कुटुंबीयांना मानसिक व मानहानीकारक त्रास देणे सुरू केले आहे. या ग्रामसेवकाच्या त्रासापासून आपल्याला संरक्षण मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांच्याकडे वीर पिता रामचंद्र जोंधळे व वीर माता कविता जोंधळे ( रा.बहिरेवाडी ता.आजरा) यांनी केली आहे.

जोंधळे कुटुंबीयांनी दिलेल्या निवदेनात असे म्हटले आहे की, ऋषिकेश जोंधळे हे जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या सीमेवर लढताना १३ नोव्हेंबर २०२० रोजी शहीद झाले. मुलगा देशासाठी शहीद झाल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून राज्यभरातून अनेक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी माझ्या घरी भेट देत आहेत. मात्र ग्रामसेवक डवरी याला या गोष्टी खटकत असल्याने तो वारंवार माझा व माझ्या परिवाराचा अपमान करीत आहे.

१ जून रोजी ग्रामसेवक डवरी यांनी माझ्या बरोबर नाहक वाद घातला व तुझ्या मुलग्याला देशासाठी कोणी मरायला सांगितले होते असे अपशब्द वापरून आपल्या देशाचा व देशाच्या सीमेवर लढणाऱ्या असंख्य जवानांचा त्यांनी अपमान केला आहे. ज्या तिरंग्यातून माझ्या मुलाचा देह बहिरेवाडी गावी आणला तो तिरंगा ध्वज मी माझ्या अंगणात उभा केला होता. ग्रामसेवक डवरी यांनी कुत्सित बुद्धीने तो ध्वजही मला बळजबरीने काढायला लावला.

माझ्या घराचे बांधकाम चालू असताना ग्रामसेवक डवरी हा माझ्याकडील बांधकाम कामगारांना नाहक त्रास देत होता. त्याच्या घराचे बांधकामाचे साहित्य जाणून बुजून आमच्या घरासमोर टाकले होते. हे साहित्य काढून घेण्याची विनंती केली असता उलट आम्हालाच शिवीगाळ करून आमचे विरोधात खोटी तक्रार दिली. त्यामुळे माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली आहे. मुलगा शहीद झाल्यानंतर कुटुंबाचा आधार गेला. अशावेळी ग्रामसेवक डवरी माझ्या कुटुंबाचा जगण्याचा आधार काढून घेत आहे.

भरचौकात फलक लावून बदनामी

गेल्या आठवड्यात भरचौकात माझ्या कुटुंबीयांची फलक लावून बदनामी केली आहे व मानसिक खच्चीकरण केले आहे. त्यामुळे माझे कुटुंब पूर्णपणे असुरक्षित बनले आहे. एकीकडे ऋषिकेश जोंधळे शहीद झाल्यानंतर शासन, अधिकारी व समाजातून माझ्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला. मात्र आता ग्रामसेवक डवरी हा आमच्याच कुटुंबीयांच्या जीवावर उठला आहे. ग्रामसेवक डवरीपासून आमच्या जीविताला धोका आहे. तो प्रशासकीय सेवेत असल्यामुळे त्याच्या पदाचा वापर करून आमच्यावर दबाव आणत आहे त्याच्यापासून संरक्षण मिळावे, अशीही मागणी निवेदनातून रामचंद्र व कविता जोंधळे यांनी केली आहे.

जोंधळे-डवरी वाद चव्हाट्यावर

घरासमोर असणाऱ्या खडीच्या कारणावरून जोंधळे व दतात्रय शंकर डवरी यांच्या मध्ये १ जून रोजी वाद झाला होता . या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. डवरी यांनी आपल्याला मारहाण जोंधळे व त्यांच्या परिवाराने केली असल्याची वर्दी आजरा पोलिसांत केली होती. तेव्हा पासून डवरी व जोंधळे यांच्यात धुसफूस सुरु होती.

डिटिजल बोर्ड हटवला

डवरी यांनी लावलेला फलक ग्रामपंचायतीने पोलिसांना बोलावून घेऊन हटवला असून तो फलक ताब्यात घेतला आहे . परस्पर विरोधी तक्रारी असल्याने डवरी व जोंधळे यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून पोलिस व ग्रामस्थ यांनी हा विषय सांमजस्याने सोडवला पाहिजे अशी ग्रामस्थांची धारणा आहे.

Web Title: Who was told to die for the country? Trouble of Gram Sevak to the family of martyr Rishikesh Jondhale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.